

मुंबई : राजेश सावंत
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांची आरक्षण सोडत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी)च्या आरक्षणाचे प्रभाग निश्चित करण्यात आल्याचे समजते. यात 15 अनुसूचित जातीसाठी, तर 2 अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर मुंबईतील 227 प्रभागांपैकी 17 प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात येते. त्यामुळे अशा प्रभागांचे आरक्षण लॉटरीद्वारे निश्चित करण्यात येत नाही. 17 प्रभाग निश्चित झाल्यानंतर उर्वरित 210 प्रभागांतून ओबीसी व महिला आरक्षण काढण्यात येते. मुंबईतील 227 प्रभागांतील लोकसंख्या व या लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती, याचा तक्ता निश्चित करण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगरांतील 15 प्रभागांमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे. तर 2 प्रभागांत अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 151 मध्ये 59 हजार 169 लोकसंख्या असून यात 26 हजार 453 अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. त्यामुळे हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 59 मध्ये अनुसूचित जातीपेक्षा अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे. या प्रभागात 589 अनुसूचित जाती व 2 हजार 403 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असल्याने हा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होणार आहे. अशाप्रकारे अन्य प्रभागांतही लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
तर हे प्रभाग होतील, एससी एसटीसाठी आरक्षित
17 प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये एससी, एसटीचे आरक्षण पडू शकते, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले.
हे प्रभाग होणार एससी व एसटीसाठी राखीव
एससी - प्रभाग क्रमांक 4, 20, 27, 28, 33, 34, 38, 39, 42, 93, 183, 186, 189, 199, 215 एसटी - प्रभाग क्रमांक 53, 59.