मुंबई : राज्य सरकारने वैद्यकीय अधिकाऱ्यांना खूशखबर दिली आहे. खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या अधिकाऱ्यांना १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे.
खंड क्षमापन झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अस्थायी सेवेत रुजू झालेले तसेच २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेव्दारे समावेशन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या निवड मंडळामार्फत नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. या अधिकाऱ्यांना विधि व न्याय विभागाच्या २८ फेब्रुवारी २०१७ च्या शासन परिपत्रकातील समान न्याय या तत्वास अनुसरुन ८ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सहयोगी प्राध्यापक, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, साथरोग तज्ज्ञ, अभिरक्षक, रसायन शास्त्रज्ञ, सुरक्षा निरीक्षक, आवासी आणि निवासीभिषक अशी ६ पदे समर्पित करून इमर्जन्सी मेडिसिन या विषयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक अशी ३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील.