

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) इनिशिअल पब्लिक ऑफरिंग्जचा (आयपीओ) आकार कमी होण्याची शक्यता आहे. काही भागधारकांनी विक्रीतून माघार घेतल्यामुळे ऑफर फॉर सेलचे (ओएफएस) प्रमाण नियोजित असलेल्या ६ वरून ५.२ ते ५.५ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना दिली.
भागीदारांच्या माघारीमुळे आयपीओचा आकार २५ ते २७ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. यापूर्वी हा आकार ३० हजार कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे एनएसईचा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता मावळली आहे. सध्या ह्युंदाई मोटार इंडियाचा २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओचा विक्रम आहे.
भविष्यात आपला हिस्सा विकल्यास अधिक चांगले मूल्य मिळू शकेल, असा विश्वास काही भागधारकांना वाटत असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, एनएसई या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आयपीओसाठीची किंमत प्रतिशेअर १,७०० ते १,७८५ रुपये असण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रतिशेअर दोन हजार रुपये किंमत अपेक्षित होती.
एनएसईचा आयपीओ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाचा डिजिटल सेवा विभाग असलेल्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या आयपीओच्या किमतीशी स्पर्धा करेल. जिओच्या आयपीओचा एकूण आकार ३७,७०० कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे. परंतु, त्यांच्या वेळेबाबत आणि समभागाच्या किमतीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही.
आयपीओ १८ सप्टेंबरला येणार?
एनएसईचा आयपीओ १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गुंतवणुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून २२ सप्टेंबर रोजी बंद होईल. शेअर्सचे लिस्टिंग २५ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पितृपक्ष कालावधीपूर्वी लिस्टिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.