पीक कर्जासाठी ‘सिबिल’ची अट नको, मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना

पीक कर्जासाठी ‘सिबिल’ची अट नको, मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष लावू नये, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाबार्डतर्फे आयोजित केलेल्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये केली.

सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाबार्डच्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 58 कोटी रुपयांची क्रेडीट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. 2021-22 या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात 47 टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल. आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या देखील आहे. शेतकर्‍याच्या सर्व कर्ज गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील तसेच आत्महत्यांचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यात येत असून अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसाठीही शेतकर्‍यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते उपयुक्त ठरु शकेल. समृद्धी मार्ग शेतकर्‍यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषि आधारित उद्योग उभारण्यास चालना देण्यात येत आहे. शेतकर्‍यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. सिबिलची आवश्यकता नाही याबाबत सविस्तर माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यात यावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news