

मुंबई : राज्यातील पहिल्या खासगी वैद्यकीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या नागपूरच्या एनकेपी साळवे वैद्यकीय विज्ञान संस्थेने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शुल्कात तब्बल ५६ टक्क्यांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी प्रतिवर्ष १३ लाख ९५ हजार रुपये असलेले शुल्क आता २१ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यात दरवर्षी साडेसात टक्के शुल्कवाढीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क १३ लाख ९५ हजार रुपये निश्चित केले होते. चालू शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाने शुल्क निश्चितीसाठी एफआरएकडे नव्याने प्रस्तावही सादर केला होता. मात्र, शुल्क निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयाचे खासगी विद्यापीठात रूपांतर करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे नव्या विद्यापीठाला शुल्करचनेसाठी एफआरएची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहिली नाही.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्करचनेनुसार राज्य कोटा आणि अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी शिक्षण व विकास शुल्क मिळून प्रतिवर्ष २० लाख ७५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. त्याशिवाय दरवर्षी एक लाख रुपये विद्यापीठ शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच ५० हजार रुपयांची परतावायोग्य अनामत रक्कम आकारली जाणार आहे. या शुल्कात दरवर्षी साडेसात टक्क्यांनी वाढ करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शुल्क ४६ हजार ६५० डॉलर निश्चित करण्यात आले आहे. संस्थात्मक कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी मात्र प्रतिवर्ष तब्बल ४३ लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
एनकेपी साळवे खासगी विद्यापीठाचाच भाग असलेल्या नागपूरच्या रणजीत देशमुख दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचे ४ लाख ७५ हजार रुपयांचे वार्षिक शुल्क आता ५ लाख ८५ हजार रुपये करण्यात आले आहे.