

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis mother controversy
मुंबई : जे रक्ताने खरे मराठा असतात, ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच आई-बहिणींचा सन्मान केला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाची लढाई लढावी, मात्र आमचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईबद्दल जर अपशब्द वापरले, तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा थेट इशारा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्यांकडून जरांगे यांच्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणे पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या लढ्याला आम्ही विरोध करत नाही. पण वैयक्तिक आणि कुटुंबीयांवर टीका करणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये वाद चिघळला आहे. बीड येथे रविवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला आहे.
या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला वेगळे वळण मिळाले आहे. भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आपली लढाई आरक्षणासाठी असून, कोणत्याही वैयक्तिक टीकेचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा नेण्याचा इशारा दिला असून, सरकारने दोन दिवसांत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली असून, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.