

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून महाराष्ट्रासह अनेक राज्यात सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुढील ४ ते ५ दिवस देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि घाट भागांतील काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही शक्यता आहे. यानंतर बुधवार २८ ऑगस्टपासून गंभीर हवामानाची तीव्रता कमी होऊन पावसाचा जोर ओसरणार असेही हवामान विभागाने सांगितले आहे, या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागप्रमुख डॉ.के. एस.होसाळीकर यांनी एक्स पोस्ट वरून दिली आहे.
राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह १२ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहे. त्यामुळे शनिवार, दि. २४ ते मंगळवार, दि. २७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.