

राजेश सावंत
मुंबई: राजकारणातील बड्या नेत्यांच्या मित्रासाठी वांद्रे पश्चिम, वांद्रे रेक्लमेशन परिसरातील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे क्रीडांगण असलेले आरक्षण म्हाडाच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बदलण्यात आले.
आरक्षण बदलणार असल्याची पक्की खात्री असल्यामुळे मैदानावर दोन ते तीन महिन्यांपूर्वीच म्हणजे आरक्षण बदलण्याच्या आधीच प्रदर्शन केंद्राच्या नावाखाली व्यावसायिक बांधकामाला सुरुवातही झाली. त्यामुळे आरक्षण बदलाचे हे नाटक पूर्वनियोजित प्लॅनिंग होते, हे स्पष्ट झाले आहे.
वांद्रे रेक्लमेशन परिसरात असलेला हा मोकळा भूखंड म्हाडाच्या मालकीचा आहे. मुंबईचा विकास आराखडा तयार करताना या भूखंडावर मुंबई महानगरपालिकेने क्रीडांगण आरक्षण टाकले. तत्पूर्वी या मोकळ्या जागेमध्ये टर्फ तयार करून फुटबॉल सामनेे विविध क्लबच्यावतीने भरवण्यात येऊ लागले.
२०११ पासून या मैदानावर मुंबई शहरातील २०० पेक्षा जास्त क्लबचे विविध सामने खेळवण्यात आले. त्यामुळे या मैदानाशी खेळाडूंचे एक घट्ट नाते तयार झाले आहे. परंतु अचानक मैदानावर पडलेले क्रीडांगणाचे आरक्षण उठवण्यासाठी म्हाडाने प्रयत्न सुरू केले.
या भूखंडावर पूर्वी असलेले कन्व्हेन्शन सेंटरचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. याला राजकारण्यांचीही साथ मिळाली. महापालिकेवर दबाव आणून, या मोकळ्या जागेवर पडलेले क्रीडांगणाचे आरक्षण बदलून कन्व्हेन्शन सेंटर करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सुधार समितीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला सुधार समिती व आता महापालिका सभागृहात घाईगडबडीत मंजुरी देऊन, आरक्षण बदलण्यात आले.
राहुल कनालसाठी
या विरोधात मुंबई फुटबॉल असोसिएशनने म्हाडाच्या ३ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्राला आणि महापालिकेच्या सुधार समितीने मे महिन्यात दिलेल्या मंजुरीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. कोर्टाच्या निर्णयावर या मैदानाचे भवितव्य अवलंबून असले तरी, ही मोक्याची जागा राजकारण्यांचे मित्र राहुल कनाल यांना देण्यासाठी आरक्षण बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते.
आरक्षण बदलण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांवर बड्या नेत्याचा दबाव होता. त्यामुळे सभागृहात विरोधकांनी रान उठवूनही या मैदानातून जाणारा रस्ता मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही न्यायालयीन अवमानाची भीती न बाळगता हा आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नागरिकांना पडलेले प्रश्न
पूर्वीचे कन्व्हेन्शन सेंटर आरक्षण क्रीडांगण झाल्याचे म्हाडाला माहीत नव्हते का ?
हायकोर्टात प्रकरण असताना पालिका सभागृहात
गडबडीत आरक्षण बदलाची घाई का ?
आरक्षण बदलण्यापूर्वी भूखंडावर बांधकाम कसे सुरू ?
बांधकामाला परवानगी कोणी दिली?
ज्याच्यासाठी आरक्षण बदलण्याची घाई केली तो मित्र कोण
आरक्षण बदलण्यासाठी दबाव आणणारा तो नेता कोण?
पडीक भूखंडाचे मैदानात रुपांतर
म्हाडाच्या मालकीचा असलेला हा भूखंड पडीक होता. या भूखंडाच्या आजूबाजूला मोठी झोपडपट्टी असल्यामुळे त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण रोखण्यासाठी म्हाडाने येथे संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी स्थानिक आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली. परंतु निधी नसल्याचे सांगून म्हाडाने हात वर केले. त्यानंतर येथे आमदार व खासदार निधीतून संरक्षण भिंत उभारण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच येथे फुटबॉल मॅच होऊ लागल्या.