

मुंबई: घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल तसेच आता साखरेबरोबर रिक्षा-टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा ऑफिस आणि मुलांच्या शाळेत ये-जाण्याच्या रिक्षा टॅक्सीचा दररोजचा प्रवास महागणार आहे.
त्याचा मोठा परिणाम मुंबईकरांच्या प्रवास खर्चावर होणार असून टॅक्सी- रिक्षाच्या भाडेवाढीने एकूणच घर खर्चाचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. टॅक्सी- रिक्षाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये तसेच रिक्षाचे भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. सरकारी अधिसूचना जारी होताच १ सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होईल. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२५ रोजी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. खटुआ समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार पुन्हा भाडेवाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे सध्याच्या २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये होणार आहे. त्यानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपये निश्चित केले जाणार आहे.
तसेच रिक्षाच्या प्रतिकिलोमीटर भाड्यातही वाढ करण्यात येणार आहे. सध्या प्रतिकिलोमीटर १७.१४ रुपये आकारले जात आहेत. ते वाढून १८.२२ रुपये होणार आहेत. पहिल्या १.५ किलोमीटरच्या भाड्यात प्रत्यक्षात १.०८ रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
ही रक्कम पूर्णांकात धरल्यास रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. इंधनाच्या किमती, वाहन खरेदीची किंमत, ग्राहक किंमत निर्देशांक, वाहन कर्जावरील व्याजदर आणि सरकारी कर या सगळ्याचा समावेश करून भाडेवाढ होते.
मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे फ्रेडरिक डिसा यांनी सांगितले की, टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे २०.६६ रुपयांवरून थेट २५ रुपये करण्याची मागणी केली होती. त्यानुसार टॅक्सीच्या किमान भाड्यात चार रुपये, तर रिक्षाच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ अपेक्षित होती. मात्र, सरकारने किमान भाड्यात दोन रुपयांची वाढ मंजूर केली आहे.
पीयूसीचे नवे दर लागू
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबरोबरच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयुसी तपासणीचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणी शुल्कात १० रुपयांची वाढ करून ते ५० वरून ६० रुपये करण्यात आले आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांचे शुल्क १०० वरून १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांचे शुल्क १२५ वरून १४० रुपये, तर डिझेल वाहनांचे शुल्क १४० वरून १८० रुपये करण्यात आले आहे.