

मुंबई: ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे; पण भाजपच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लीक करणारे माफिया मोकाट सुटलेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दरम्यान, पेपर लीकप्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून अटक करा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. शिक्षण क्षेत्रात माफियाराज सुरू आहे. 3 मे रोजी पार पडलेल्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती.
मात्र, पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आल्याने सुमारे 22 लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. नीट परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांशी निगडित आहे.
त्यामुळे पेपर रद्द होणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आशा-आकांशांचा चुराडा आहे, असा संतापही सपकाळ यांनी व्यक्त केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करतानाच नीट-यूजी परीक्षेत 2024 मध्येही पेपरफुटी झाली होती. सुरुवातीला सरकारने आरोप फेटाळला होता; पण बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे प्रधान यांनी मान्य केले होते, असेही सपकाळ म्हणाले.