

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही करून मुंबईमध्ये महायुतीनेच महापालिका निवडणूक लढवायची आहे, हे स्पष्ट झाले. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भाजप नेते तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला 50 जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे.
मुंबईत आमच्या पक्षाचा एकमेव आमदार असला तरी पक्षाची मतपेढी आहे. किमान 55 ते 60 प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महायुतीच्या माध्यमातून निवडून येतील, असा दावाही तटकरे यांनी या भेटीत केल्याचे कळते. या भेटीवेळी आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावरचे आरोप लक्षात घेता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सामावून घेणे कठीण नव्हे तर अशक्य असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितल्याचे समजते. मात्र महायुती सरकारचा अविभाज्य भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या आक्षेपामुळे कोणताही बेबनाव निर्माण होणार नाही असेही या भेटीत स्पष्ट करण्यात आले.
पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे युती होणे अशक्य आहे. त्यामुळे विरोधकांचा लाभ होईल हेही पुन्हा एकदा सांगण्यात आल्याचे समजते. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे मुंबईत आम्हाला किमान काहीतरी स्थान द्या अशा मागणीचा पुनरुच्चार तटकरे यांनी या भेटीत शेवटीही केला असल्याचे समजते.
बावनकुळेंच्या भूमिकेमुळे संभ्रम
मुंबई महापालिकेच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीला महायुतीत स्थान नाही, असे म्हटले होते. त्याआधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हीच भूमिका मांडली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दर्शवले होते. अमित साटम यांच्यासोबत उपस्थित असलेले उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीला महायुतीत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मलिकांकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व दिल्यास भाजपची नाराजी नसेल, अशी विपरित भूमिका मांडल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.