मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत सामील झाला त्याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या विचारधारेला बाजुला सारून राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्र येत असल्याचे सांगत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गळ्यात गळे घातले. अशावेळी अजित पवार गट सोबत घेतल्याने शिंदे गटाने सुरुवातीला आदळाआपट केली. पण ती फारशी चालली नाही. आता या दोन महिन्यांत अजित पवार आणि त्यांचे मंत्रीही महायुतीत स्थिरस्थावर झाले आहेत. त्यांना शिंदे गटानेही स्वीकारले आहे याचा प्रत्यय शुक्रवारी महायुतीच्या पहिल्या संयुक्त बैठकीत आला. लोकसभेसाठी महायुतीत सामील झालेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट जागा वाटपात तडजोड करण्यास तयार असल्याचे चित्रही या बैठकीतून दिसून आले..
राज्यात इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईतील ग्रँट हयात हॉटेलमध्ये पार पडली. नेमका याच बैठकीचा मुहूर्त साधत महायुतीची बैठक मुंबईत झाली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून खाली खेचण्याचा एकमेव अजेंडा घेऊन विरोधी पक्षातील २८ पक्षांचे नेते मुंबईत एकत्र आले. पहिल्या दिवशी हयात हॉटेलमध्ये त्यांची मेजवानी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवास्थानी महायुतीच्या आमदार, खासदारांसोबत डीनर घेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मंजूर केला. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असल्याचा ठरावही यावेळी केला. त्यामुळे हयातमध्ये मोदी हटावचे नारे सुरू झाले असताना वर्षावर फिर एक बार मोदी या ठरावाने प्रतुत्तर देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी वरळीत महायुतीची संयुक्त बैठक झाली. ही तिन्ही पक्षाची एकत्र अशी पहिलीच बैठक होती. या बैठकीत अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा दिला. आम्ही विचारधारा बाजुला ठेवून राज्य आणि देशाच्या विकास आणि हितासाठी तुमच्यासोबत आलो आहोत. मागे जे झाले ते गंगेला मिळाले. आता मागचे सोडा. पुढे एका दिशेने जाऊ असे अजित पवार यांनी सांगितले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत तीन पक्षाचा हा फेविकोलचा जोड असल्याचे सांगितले. हा जोड आता कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुटणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिंदे गटानेही अजित पवार यांच्या विषयी असलेले मतभेद आता बाजुला केल्याचे दिसून आले. या बैठकीचा प्रारंभ करताना शिंदे गटाचे फायरब्रांड नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही मतदारसंघात कायम राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात लढत आलो. आता अजित पवार सोबत आले आहेत. आता मतदारसंघात देखील राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आमच्यासोबत चालू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजित पवार यांनी ती मान्य करत महायुतीच्या तिनही पक्षांनी आता एका दिशेने आणि एका दिलाने काम करायचे आहे असे सांगत गुलाबराव पाटील यांना तुम्हाला आमची मते मिळतील अशी हमी दिली. त्यामुळे शिंदे गटाच्या इतर आमदार आणि खासदारही सुखावले.
आतापर्यंत शिवसेनेत आपला उमेदवार धनुष्यबाण हा निष्ठेचा शब्द समजला जात होता आणि पाळलाही जात होता. कट्टर शिवसैनिक पक्ष देईल त्या उमेदवाराला मतदान करत असत. महायुतीने या बैठकीतून आपला उमेदवार मोदी असा नारा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी देखील हाच नारा दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २३, शिवसेनेला १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार अजित पवार यांच्यासोबत आले आहेत. यामुळे यावेळी भाजपाला जादा जागा लढण्याची संधी मिळू शकते. शिंदे गट आणि राष्ट्रवादीला जागा वाटपात तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. आता पुन्हा एकदा मोदी हा संदेश खालच्या कार्यकत्यांपर्यंत जाण्यासाठी जिल्हा आणि मतदारसंघनिहाय महायुतीचे संयुक्त मेळावे होणार आहेत.