NCP Merger : अखेर मनोमिलन होणार? येत्या १० तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता; शशिकांत शिंदेंचा खळबळजनक दावा

विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Shashikant Shinde
Shashikant Shinde Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगली आहे. येत्या १० तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता असून, त्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत आणि दोन्ही गटांतील अंतर्गत घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘‘आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील. यापूर्वी १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दुर्दैवाने त्याच काळात अजित पवार यांचे निधन झाले आणि ती प्रक्रिया थांबली. जर त्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र आले असते, तर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे दिसले असते.’’

पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अत्यंत घट्ट भावनिक नाते होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे, ही त्या दोघांचीही मनापासून इच्छा होती. आज सुनील तटकरे यांच्या विधानामुळे आम्ही सातत्याने करत असलेल्या दाव्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.’’

दरम्यान, या संभाव्य विलीनीकरणाच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचेही त्यांनी सूचित केले. ‘‘खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली असून, येत्या १० तारखेला पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल आणि १० तारखेला जे काही ठरेल ते अधिकृतपणे सर्वांसमोर येईल,’’ अशी माहितीही शशिकांत शिंदे यांनी दिली.

गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या या अधिकृत वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून, येत्या १० तारखेला होणाऱ्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.