

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात पाणीसाठा ८७ टक्के शिल्लक असल्याने दुष्काळी संकटाची तयारी म्हणून शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबरपासून नवी मुंबईत १०% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.
मुंबई पाठोपाठ स्वतः च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. मात्र, जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे दरवर्षी पूर्ण भरणारे मोरबे धरण यावेळी पूर्ण भरू शकले नाही.
नवी मुंबई महापालिकेला ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावरच पाणी कपातीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. यापूर्वी फक्त जुलै महिन्यातील पाऊस पाहून प्रशासनाने लागू केलेली पाणी कपात रद्द करण्यात आली होती. ती पुन्हा लागू करावी लागत आहे.
सध्या मोरबे धरणात केवळ ८७% पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीच्या अंदाजानुसार हा पाणीसाठा फक्त मार्च २०२७ अखेरपर्यंतच पुरू शकतो. आता पाणीकपात न केल्यास एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नवी मुंबईकरांना पाणी उपलब्ध नसेल, अशी स्थिती आहे. त्यामुळेच येत्या शुक्रवारपासून शहरात १०% पाणी कपात लागू करण्यात येत असून या कपातीचा परिणाम म्हणजे मोरबे धरणातून दररोज २५ ते ३० एमएलडी पाणी कमी उचलले जाईल.
बारवीच्या ५० एमएलडी पाण्याचा आधार
जानेवारीत पहिल्याआठवड्यापासून पाणी कपातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. तेव्हा ३५ ते ४० एमएलडी पाणी कमी उचलले जाईल. डिसेंबर महिन्यातील पाणीसाठा तपासून या दुसऱ्या टप्प्यातील कपातीचे प्रमाण निश्चित केले जाईल.
दुसरीकडे, नवी मुंबई महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून ५० एमएलडी पाणी मिळण्याची शक्यता आहे, तसा शब्द एमआयडीसीने महापालिकेला दिला आहे. जर हे ५० एमएलडी पाणी मिळाले, तर पाणी जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेल, अशी आशा महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.