

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने शंभर माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकिटांचे वाटप केले होते. मात्र नवी मुंबईकरांनी 26 मातब्बर माजी नगरसेवकांना धक्का देत नवीन 50 चेहऱ्यांना सभागृहात पाठवले. तर 61 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत आता महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते या प्रमुख पदांवर महिलांची वर्णी लागते की पुरुषांची हे आता आरक्षण सोडतीनंतरच कळेल. सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे या तीन माजी महापौरांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तिन्ही सदस्य हे भाजपचे नगरसेवक असून सागर नाईक हे मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे आहेत. तर सोनावणे आणि सुतार हे कट्टर नाईक समर्थक म्हणून ओळखले जातात. या माजी महापौरांना सभागृहाचा उत्तम अनुभव आहे. त्यामुळे आता नव्या चेहऱ्याला संधी मिळणार की माजी महापौरांपैकीच कुणाची वर्णी लागणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल.
महापालिकेत सलग पाच वेळा निवडून आलेल्या सदस्यांमध्ये डॉ. जयाजी नाथ, जयवंत सुतार, अशोक विठ्ठल पाटील, अनिता शिवराम पाटील आणि शिवराम पाटील यांचा समावेश आहे. तर सलग चौथ्यांदा बाजी मारत महापालिका निवडणुकीत मैदान पटकाविणाऱ्यांमध्ये माजी महापौर सुधाकर सोनवणे, रंजना सोनावणे, दशरथ भगत, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, किशोर पाटकर, हेमांगी सोनावणे, नेत्रा शिर्के यांचा समावेश आहे. महापालिकेत 111 सदस्यांपैकी 62 ठिकाणी महिला, तर 49 पुरुष सदस्य विजयी झाले.