

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील चर्चा फिस्कटली असून हे दोन्ही मित्रपक्ष एकेमेकांविरोधात स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेचे प्रमुख आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षाचा हाय-व्होल्टेज ड्रामा नवी मुंबईकरांना अनुभवयाला मिळणार आहे.
भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी तोडीसतोड तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर मैदानात उतरवले आहेत. त्यात हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नसून ठाणे विरुद्ध नवी मुंबईच्या वर्चस्वाचा आणि अस्तित्वाचा असणार आहे. गेल्या सात वर्षांपासून नवी मुंबईवर असलेले प्रशासक राज आणि त्यामुळे काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे नवी मुंबईकर नाईक साम्राज्याला साथ देते की शिंदेंच्या रूपाने होणारा बदल स्वीकारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या ३० वर्षांपासून नवी मुंबईवर गणेश नाईक यांचे एकछत्री वर्चस्व आहे. ज्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे आव्हान दिले आहे. १९९२ मधील स्थापनेपासून नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असे समीकरण राहिले आहे. नाईक यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप अशा विविध पक्षांत प्रवास केला, पण शहरावरील त्यांची पकड ढळली नाही. २०१५ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत असताना त्यांनी ५२ जागा जिंकून सत्ता राखली होती, तर तेव्हा भाजपला केवळ ६ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने ३८ जागा जिंकल्या होत्या. शिंदे विरुद्ध नाईक वादाची अनेक कारणे आहेत. दोन्ही नेते पूर्वी शिव सेनेत असतानापासूनच त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती. दोघांमध्ये टोकाचा संघर्ष आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख ठाण्याचा राक्षस असा केला होता, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले. शिंदे गटाचा असा दावा आहे की नवी मुंबई ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, तर नाईक समर्थकांना वाटते की ठाण्याचे नेते इथे येऊन सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिंदे गटाची नवी मुंबईतील वाढती ताकद, उप मुख्यमंत्री पद आणि सत्तेची सूत्रे हातात असल्याने शिंदेंनी नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्प आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये स्वतः लक्ष घातले आहे. वाशी, नेरुळ, सीबीडी, कोपरखैरणे, घणस-ोली पुनर्विकास प्रकल्पांना मंजूर देण्यापासून कामाची सुरुवात होते. तोपर्यंत सर्व फाईल मार्गी लावण्यासाठी शिंदेंचा पुढाकार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदललेली आहेत.
भाजपने शिंदे गटाचा प्रभाव रोखण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निरीक्षक म्हणून पाठवले आहे. राज्यात महायुती असली तरी गणेश नाईक यांनी नवी मुंबईत शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवण्यास नकार देऊन स्वबळाचा नारा दिला आहे.
मतभेदांचा फायदा ठाकरे गटाला
उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र निवडणूक लढवणार असल्याने त्यांची मोठी ताकद नवी मुंबईत दिसून येईल. शिंदे आणि नाईक यांच्यातील मतभेदांचा फायदा काही प्रमाणात ठाकरे गटाला होऊ शकतो.
नवी मुंबईत एकूण ९,४८,४६० मतदार असून त्यात १,३३,००० नवीन मतदारांची भर पडली आहे, एकूण २८ प्रभागातून १११ नगरसेवक महापालिका सभागृहात पाठवणार आहेत.