

नवी मुंबई : भाजपच्या उमेवारी वाटपावरून नवी मुंबईत भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचेच नेते असलेले वनमंत्री गणेश नाईक यांच्यात खुला सामना सुरू झाला आहे. गणेश नाईक यांनी तिकीट वाटपात उघडपणे पक्षपात केला, भाजपमध्ये राहन स्वतःची घराणेशाही चालवली आणि पक्षाच्या निष्ठावानांना डावलल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी भरगच् पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. आता नवी मुंबई महापालिकेत १११ जागा निवडून आणण्याचे खुले आव्हानच त्यांनी नाईकांन दिले.
घरच्यांना जेवण घालता आणि कार्यकर्त्यांना उपाशी ठेवता
ज्यांनी कधी भाजपचे कमळ चिन्ह वापरले नाही, अशा नाईक कुटुंबाला चार-चार तिकिटे दिली गेली. ही एकप्रकारे कार्यकर्त्यांची थट्टा आहे. "तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांना उपाशी ठेवता," अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर प्रहार केला.
मागच्या निवडणुकीत राजकीय डावपेच आखून नाईकांनी माझा मुलगा निलेश म्हात्रेचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. निलेश म्हात्रे यांना कोणतीही हालचाल करता येऊ नये म्हणून अगदी शेवटच्या पाच मिनिटांत संजीव नाईक यांना जबरदस्तीने फॉर्म भरायला लावला. हे सर्व नियोजनपूर्वक करण्यात आले होते. या महापालिका निवडणुकीत गणेश नाईकांनी १११ जागा निवडून आणून दाखवाव्यात. मी राजकारणातून निवृत्ती घेते असे आ. मंदा म्हात्रे यांनी जाहीर केले.
जिल्हाध्यक्ष काय म्हणतात ?
मंदा म्हात्रे यांनी सुचवलेली १३ नावे पक्षाच्या अंतिम यादीत नसल्यामुळे, त्या फॉर्मवर कायदेशीररीत्या स्वाक्षरी करू शकल्या नाहीत. जिल्हा कमिटीने ८५७ इच्छुकांच्या मुलाखती घेऊन ती नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष, निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांनी मिळून अंतिम उमेदवार निश्चित केले आहेत. मंदा म्हात्रे यांनी केलेल्या फसवणुकीच्या आरोपानुसार कोणताही कट किंवा खेळी नाही. ज्या उमेदवारांची नावे अधिकृत यादीत होती, त्यांनाच नियमानुसार एबी फॉर्म देण्यात आले आहेत असा खुलासा भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी केला.
मंदा म्हात्रेचा जो काही गैरसमज झाला असेल, तो दूर करण्यासाठी राजेश पाटील त्यांच्या भेटीला गेले आहेत. नाईक परिवाराचा कोणाचे तिकीट कापण्यात किंवा सिट कट करण्यात हात नाही. सर्व निर्णय पक्षाच्या प्रक्रियेनुसार घेतले जातात. १११ जागांसाठी साडेसह-ाशेहून अधिक अर्ज आले होते, त्यामुळे सर्वांना तिकीट देणे शक्य नसते, मात्र पक्ष कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.
संजीव नाईक, निवडणूक प्रमुख भाजप नवी मुंबई