

नवी मुंबई: गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांचे निलंबन मंगळवारी झालेल्या महासभेत रद्द करण्यात आले.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात कामात कसूर झाल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्तांनी डॉ. भावना पगारे यांना निलंबित केले होते.
या कारवाईनंतर वैद्यकीय वर्तुळासह विविध स्तरांतून चर्चा सुरू होती. मंगळवारी झालेल्या महासभेत या निलंबनासंदर्भातील ठराव मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक जयाजी नाथ यांनी ठरावाला हरकत घेतली.
डॉ. पगारे यांच्याविरोधात कोणतीही ठोस माहिती, चौकशी अहवाल किंवा गुन्हा दाखल नसताना त्यांना निलंबित करणे योग्य नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे असे मत त्यांनी मांडले.
जयाजी नाथ यांच्या हरकतीनंतर महासभेत या विषयावर कोणत्याही नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यानंतर निलंबनाच्या ठरावाला मंजुरी न देता तो नामंजूर करण्यात आला. परिणामी, डॉ. भावना पगारे यांचे निलंबन रद्द झाल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. आता या प्रकरणाच्या चौकशीचे काय होणार असा प्रश्न पुढे आला आहे.