

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत काढल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे मंत्री गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असताना भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईकांना महापौर पदावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी मुंबईतील साम्राज्य पलटी होण्यास आता वेळ लागणार नाही, असे सांगत नवी मुंबईचा महापौर या वेळी घराणेशाहीतून नसेल तर सामान्य घरातील नगरसेवक होईल असे वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. म्हात्रे यांनी यावेळी 25 वर्षांपूर्वी आपल्या मुलाचा घेतलेला राजकीय बळीची सल बोलून दाखवत, मी 30 वर्षे सक्रीय राजकारणात असून माझ्या घरातील एकाही नगरसेवक नाही.
यावेळी लोकांची मागणी आहे मुलगा किंवा सुनेला पॅनलमध्ये तिकिट द्या. मी हा निर्णय मुलांवर सोपवला आहे. मात्र नवी मुंबईचे महापौर भाजपचाच होईल आणि तो सर्वसामान्य घरातील होईल. मी घराणेशाही थोपविणारी बाई नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई महपालिकेत 56 महिला नगरसेविका निवडून जाणार आहेत. तसेच महापौरपद महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी स्पर्धा असणार आहे.
नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न
एका पक्षात असा की वेगवेगळ्या मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष हा नवी मुंबईकरांनी नेहमीच अनुभवला आहे. या महापालिका निवडणुकीतही तो पेटणार असून याची ठिणगी मंदा म्हात्रे यांनी टाकली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद हे आतापर्यंत काही अपवाद वगळता नाईक कुटुंबातच राहिले आहे. या निवडणुकीतही नाईक कुटुंबात महापौरपद जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी आताच घराणेशाहीचा आरोप करीत नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय संघर्ष पुढील काळात आणखी पेटणार आहे.