

नवी मुंबई: पितृपक्षामुळे पालेभाज्यांना मागणी वाढली असतानाच पावसामुळे काही भागांतून होणाऱ्या आवकेत घट झाली आहे. त्याचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारावर झाला असून गेल्या काही दिवसांत पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू आणि कांदापात यांच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ बाजारातही ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक होत असते. मात्र, पावसाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर तसेच वाहतुकीवर होत असल्याने काही दिवसांपासून आवकेत चढ-उतार दिसून येत आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक कमी पडत असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या एपीएमसीच्या घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी आणि पालकाच्या जुडीचे दर साधारण ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. शेपूची जुडीही ३० ते ३५ रुपयांपर्यंत विकली जात आहे. कांदापातीच्या दरातही वाढ झाली आहे.
पितृपक्षात विविध धार्मिक विधींसाठी पालेभाज्यांची मागणी वाढत असल्याने सध्या नेहमीच्या तुलनेत बाजारात पालेभाज्यांची खरेदी वाढली आहे. एपीएमसी बाजारातील भाजी मार्केटमध्ये आवक मंदावल्याचा फटका किरकोळ बाजारातील ग्राहकांना बसला आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम नवी मुंबईतील किरकोळ बाजारावर झाला आहे.
घाऊक दराबरोबर वाहतूक, विक्रीचा खर्च आणि इतर खर्च वाढल्याने ग्राहकांना पालेभाज्या अधिक दराने खरेदी कराव्या लागत आहेत. कोथिंबीर, मेथी व पालकाच्या दरवाढीचा फटका गृहिणींना बसत आहे.
पालेभाज्यांच्या जोडीला अन्य भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर मागणी कमी होऊन आवक सुरळीत झाल्यास पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता बाजारातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.