

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून प्रवासी सेवेत दाखल होत असून, पहिल्याच दिवशी 30 विमानांचे टेकऑफ या विमानतळावरून होईल. पहिल्या दिवशी कोची, हैदराबाद, बंगळूर, गोवा, अहमदाबाद ही शहरे नवी मुंबईशी हवाई मार्गाने जोडली जातील व त्यासाठी सुमारे चार हजार प्रवासी या नव्या कोऱ्या विमानतळावरून टेक ऑफ करतील.देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारपासूनच मालवाहू विमानेही उडू लागतील.
नवी मुंबई विमानतळावरून प्रथम प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने जोरदार तयारी केली आहे. नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर असलेल्या तरघर रेल्वे स्थानकापासून ते विमानतळापर्यंत जाण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने वाहनांची व्यवस्था केली आहे.
एनएमएमटी व्यवस्थापनही आपल्या बसेस विमानतळ मार्गावर चालवणार आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत येथून दररोज होणाऱ्या उड्डाणांची संख्या 48 पर्यंत जाईल आणि मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याचे सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने दोन विमानतळे असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. दिल्लीमध्ये दोन विमानतळ असले तरी दुसरे विमानतळ अद्याप सुरू झालेले नाही. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी प्रवास करतील. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हीच प्रवासी संख्या नऊ कोटीपर्यंत जाईल, असे सिंघल म्हणाले.
नवी मुंबई विमानतळावर सध्या एक धावपट्टी आहे. दुसरी धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. तिसरी धावपट्टी तयार करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. धावपट्टी आणि अन्य तांत्रिक बाबींचे नियोजन करण्याकरिता सल्लागार नेमण्यासाठी अनुभवी संस्थांकडून टेंडर मागवण्यात आले आहेत,
विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको