waste to energy project : कचरा प्रकल्पाच्या बदल्यात घेतली मर्सिडीज

नवी मुंबई महापालिका सभागृह नेते सागर नाईकांवर गंभीर आरोप; विरोधकांकडे मुद्दे नाहीत: सागर नाईक
waste to energy project
waste to energy projectpudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आज तुर्भे येथील वेस्ट-टू-एनर्जी म्हणजेच कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणार्‍या प्रकल्पाचे ७२९ कोटींचे कंत्राट बहाल केल्याबद्दल आणि त्‍यासाठीचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) जारी करण्याच्या २४ तास आधी संबंधित कंपनीकडून मर्सिडीज कार घेण्याचा प्रताप नवी मुंबई महापालिकेचे सभागृहनेते सागर नाईक यांनी केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर पाटकर यांनी हा आरोप करताच नवी मुंबई महापालिकेत रणकंदन सुरू झाले आहे.

शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी अंगावर काळे निषेध बॅनर परिधान करून महासभेत जोरदार गोंधळ घातला. परिणामी महापौर सुजाता पाटील यांना कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

waste to energy project
Social media defamation : सोशल मीडियावरील बदनामीला लगाम घालण्यास नवा कायदा ?

तुर्भे येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प तुर्भेऐवजी इतरत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि किशोर पाटकर यांनी केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या दालनात ठिय्या मांडून प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी निविदेतील अटी व शर्ती समजावून सांगत लोक प्रतिनिधींनीही प्रशासनासोबत पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असे स्पष्ट केले.

आयुक्तांच्या दालनातून बाहेर पडल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी काळे बॅनर परिधान करूनच महासभेत प्रवेश केला. गटनेते मनोज हळदणकर बोलण्यास उभे राहताच ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतार आणि सत्ताधारी नगरसेवकांनी काळे बॅनर काढून बोलण्याची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापौरांनी निलंबनाचा इशारा देऊनही गोंधळ कायम राहिल्याने अखेर कामकाज तहकूब करण्यात आले. ​

waste to energy project
Social media defamation : सोशल मीडियावरील बदनामीला लगाम घालण्यास नवा कायदा ?

या गोंधळात किशोर पाटकर यांनी सागर नाईक यांनी कचरा प्रकल्प कंत्राटदाराकडून घेतलेल्या मर्सिडीजचा मुद्दा उभा केला. गेले सहा महिने ही कार ते बेनामी कार वापरत असून हा थेट गुन्हा ठरत असल्याचे ते म्हणाले. या कोर्टाच्या बनावट ऑर्डर प्रकरणातही सागर नाईक यांचाच सहभाग असल्याचा दावा किशोर पाटकर यांनी केला. हे सर्व प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

प्रकरण काय आहे?

महापालिकेच्या तुर्भेतील प्रकल्पाची निविदा आरएनबी ग्रीन टेक एलएलपी या कंपनीला देण्यात आली आहे. शिवसेनेकडून ज्या मर्सिडीज कारचा उल्लेख आज महासभेत करण्यात आला. त्या कारचा नंबर एमएच 43/ सीआर 0001असा आहे. ही कार सभागृह नेते सागर नाईक यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून दिसते. मात्र ही कार या कंपनीच्या मालकीची असल्याचे म्हटले जाते. या कंपनी मालकाची आणखी एक आरएनबी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड नावाची दुसरी कंपनी आहे. कंपनीचे मालक रत्नसिंग राठोड असून मौनिष शुक्ला हा कंपनी कंत्राटदाराची बाहेरील सर्व कामे चोखपणे सांभाळतो.

नाईकांचा खुलासा संबंधित लक्झरी गाडी ठेकेदाराच्याच नावावर असून ती मी नियमित वापरत नाही. कंत्राट मिळाले म्हणजे मी त्या व्यक्तीसोबत असतो असा अर्थ होत नाही. जुने व्हिडीओ आणि फोटो एकत्र जोडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचला आहे. पुरावे असतील तर विरोधकांनी प्रशासनाकडे किंवा न्यायालयात जावे; बिनबुडाचे आरोप केल्यास न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करेन.

सागर नाईक, सभागृह नेते

विरोधकांचा निशाणा "भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. ७२९ कोटींच्या वर्क ऑर्डरच्या २४ तास आधी मर्सिडीज कारचे रजिस्ट्रेशन कोणासाठी केले जाते? सत्ताधारी आणि कंत्राटदारांचे लागेबांधे आता स्पष्ट झाले आहेत." -

विजय चौगुले, शिवसेना नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news