

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नांदेड आणि संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयातील घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेचारशे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालये म्हणजे स्मशानभूमी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका करत या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले, रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध असू नयेत, रुग्णांचा जीव औषध उपलब्ध नसल्याने जातो. रुग्णांना त्याठिकाणी वेळेवर उपचार होत नाही, म्हणून त्यांना जीव गमवावा लागतो. डॉक्टर वेळेवर उपचार करत नाहीत, अनुभवी डॉक्टर नाहीत. औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव या सगळ्या गोष्टी मृत्यूस कारणीभूत असतील तर या सरकारनेच बालकांचा आणि लोकांचा बळी घेतला आहे, असा आरोपही त्यांनी केला. खासगी रुग्णालयातील डॉक्टर सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेल्यामुळे ते सर्व रुग्ण आमच्याकडे आले आणि ते गंभीर असल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला, हे नांदेड रुग्णालयाचे डीन वाकुळे यांचे वक्तव्य पोरकटपणाचे आहे. अशी विधाने करणाऱ्या डीला तातडीने निलंबित करा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
कळव्यामध्ये १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या चौकशीत काय झाले, चौकशी समिती नेमून किती दिवस झाले, किती लोकांवर कारवाई झाली, कोण दोषी आहे हे सिद्ध झाले का, अशी विचारणा करत नांदेड रुग्णालयातील मृत्यूची चौकशीचा फार्स कशाला, असा संतप्त सवालही वडेट्टीवार यांनी केला
दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक संस्था आणि त्यांच्या पत्रकारांवर टाकलेल्या छाप्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या कृतीचा निषेध करत सरकारवर निशाणा साधला. आमच्या विरोधात कोणतीच बातमी देऊ नये अशी मानसिकता काही लोकांची झाली आहे. देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींची गळचेपी होत आहे. दिल्ली पोलिसांनी आज टाकलेले छापे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असा आरोप त्यांनी केला.