

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेची महापौरपदाची आरक्षण सोडत आज गुरुवारी सकाळी निघणार असून आरक्षण काय पडणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत महापालिकेचे 25 वर्षांत 10 जणांनी महापौर पद भूषविले आहे. त्यात मंत्री गणेश नाईक यांच्या परिवारातील संजीव नाईक (दोनवेळा), तुकाराम नाईक (एकवेळा) आणि सागर नाईक ( तीनवेळा ) असे मिळून या तिघांनी 12 वर्षे महापौरपद भूषविले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 111 पैकी 65 जागांवर दणदणीत विजय मिळवून वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांची सत्ता कायम ठेवली आहे. पहिल्यांदा एकहाती सत्ता आणण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महिला आणि पुरुष नगरसेवकांमध्ये अनेक पर्याय भाजपमध्ये असून, आरक्षणाच्या सोडतीवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे
नवी मुंबई महापालिकेची स्थापना 1992 मध्ये झाली. त्यानंतर 1995 मध्ये पहिली निवडणूक झाली. त्यावेळी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होत संजीव नाईक हे पहिले तरुण महापौर झाले. तेव्हापासून आजपर्यंत सलग महापालिकेवर नाईकांनी ठरवलेलाच महापौर राहिलेला आहे. आताही गणेश नाईक महापौर ठरवणार आहेत, परंतु त्याला आरक्षणाचे वलय असणार आहे. हे महापौरपद बाहेर जाण्यापेक्षा नाईकांच्या मर्जीतील अथवा घरातील नगरसेवकास मिळण्याची अधिक शक्यता वर्तविली जात आहे.
महिलांमध्ये पहिली महिला महापौर होण्याचा मान सुषमा दांडे यांना मिळाला होता. नवी मुंबईच्या पहिल्या महिला महापौर म्हणून 1996 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यानंतर मनीषा भोईर (2005) आणि अंजनी भोईर (2007) आणि विजया म्हात्रे या 1998, अंजनी भोईर 2007 मध्ये महापौर झाल्या होत्या. या महिला महापौरांनी त्यांच्या कालावधीत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
महापौरांचा कार्यकाळ (1595 ते 2020)
संजीव गणेश नाईक : 1995 ते 1996
सुषमा दांडे : 1996 ते 1997
दशरथ तथा चंदू राणे : 1997 ते 1998
विजय म्हात्रे : 1998 ते 1999
तुकाराम नाईक : 1999 ते 2000
संजीव नाईक :2000 ते 2003
सागर नाईक : 2003 ते 2005
मनीषा भोईर :2005 ते 2007
अंजनी भोईर : 2007 ते 2010
सागर नाईक : 2010 ते 2012
सागर नाईक : 2012 ते 2015
सुधाकर सोनवणे :2015 ते 2017
जयवंत सुतार : 2017 ते 2020