

दिलीप सपाटे, मुंबई
मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपच्या विरोधात एकत्र आलेली महाविकास आघाडी निवडणुकीच्या आधीच विखुरण्याच्या मार्गावर आहे. भाजप निवडणुकांमध्ये मतांची चोरी करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने नुकताच मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे महायुतीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्धारही व्यक्त केला. मात्र, आता महाविकास आघाडीची वीण एकवटण्याआधीच विस्कटण्याच्या मार्गावर आहे.
मुंबईत कायदा हातात घेणार्या मनसेबरोबर आघाडी न करण्याची भूमिका काँग्रेसने जाहीर केली. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एकदिवसीय चिंतन शिबिरानंतर मुंबई पालिकेसाठी हा निर्णय जाहीर करत स्वबळाचा नारा दिला. काँग्रेसच्या या भूमिकेने महाविकास आघाडीचे जहाज निवडणुकीआधीच फुटणार, हे स्पष्ट झाले आहे.
उत्तर भारतात काँग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस कमी होत चालला असला तरी मनसेसोबत गेल्यास त्याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात भोगावे लागतील, अशी काँग्रेसची धारणा आहे. त्यामुळे काँग्रेसने उद्धव-राज ठाकरे युतीत सामील होण्यास नकार दिला. म्हणून मुंबईसह अन्य पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मतविभाजन होईल.
निवडणूक का वेगळी लढवता?
काँग्रेसला राज-उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवार सोबत हवे आहेत. शरद पवार गटाबरोबर मुंबईत युती व्हावी, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने बुधवारी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.
या शिष्टमंडळात आमदार अस्लम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांचा समावेश होता; पण पवार अजूनही मनसेसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक आहेत. मतदार यादी घोळ व मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढला. मग निवडणूक का वेगळी लढवता, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे महाविकास आघाडीचे काय होणार आणि नेमके कोण कोणासोबत जाणार यावर संभ्रम कायम आहे.
...तर महायुतीला फायदा
महाविकास आघाडीची शकले उडाली तर त्याचा लाभ भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी महायुतीला होणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होईल व मुस्लिम-दलित मतदारांची साथ लाभल्यास मुंबई मनपा निवडणूक महायुतीला सोपी राहणार नाही. पण, काँग्रेस स्वतंत्र लढली तर काँग्रेससोबत असलेल्या मुस्लिम-दलित मतांमध्ये फूट पडेल, हे निश्चित! त्यामुळे विरोधी पक्षातील फाटाफूट महायुतीच्या पथ्यावर पडणारी ठरेल!
कुणासोबत जावे, पवारांसमोर पेच!
एका बाजूला उद्धव-राज ठाकरे मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांत एकत्र लढण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्याद़ृष्टीने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशावेळी शरद पवार यांची मात्र कोंडी झाली आहे. निवडणुकीत उद्धव-राज ठाकरे यांच्या युतीमध्ये सामील व्हावे की, जुना सहकारी काँग्रेससोबत जावे? असा पेच पवारांना पडला आहे.
त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेससह भाजप विरोधी सर्वच पक्षांची मोट बांधावी, अशी भूमिका घेतली आहे. सत्याचा मोर्चामध्ये आपण एकत्र सामील होतो, मग निवडणुकीत आघाडी का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला आहे.