

मुंबई : धर्माच्या नावावर भिंती उभ्या राहतात, समाज विभागला जातो, पण खरी भक्ती या सीमा सहज ओलांडते. याचे जिवंत उदाहरण सांताक्रूझ वाकोला, पाईपलाईन येथे पाहायला मिळते. गेल्या 45 वर्षांपासून मोहम्मद ताहीर शेख आणि त्यांची पत्नी जुबेदा मोहम्मद ताहीर शेख हे मुस्लिम दाम्पत्य, जय मातादी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून अखंड श्रद्धा आणि भक्तीभावाने नवरात्रोत्सव साजरा करत आहे. आजच्या धर्मांधतेच्या काळात हा उत्सव सामाजिक सलोखा, ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारा दीपस्तंभ ठरत आहे.
या दाम्पत्याने 1980 मध्ये मंडळाची स्थापना केली. इतर ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा केली जाते, पण शेख दांपत्याने कधीही सार्वजनिक वर्गणी गोळा केली नाही. स्वखर्चाने देवीची मूर्ती बसवून, नऊ दिवस दिवसरात्र भक्तिमय वातावरणात हा उत्सव रंगवला जातो. समाजातील काही दानशूर व्यक्ती मनापासून मदतीचा हात पुढे करतात, पण त्यामागे दिखावा किंवा प्रसिद्धीची हाव नसते.
शेख दांपत्याने या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. दरवर्षी नऊ दिवस भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. दररोज हजार ते बाराशे लोक या प्रसादाचा लाभ घेतात. मोहम्मद ताहीर शेख यांचे वय आता 73 वर्षे, तर जुबेदा शेख 70 वर्षांच्या आहेत. शरीर थकले असले तरीही त्यांच्या चेहर्यावरचा उत्साह आजही पंचवीशीतील तरुणांना लाजवेल असा आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत हा उत्सव आम्ही सुरू ठेवणार, असा निर्धार जुबेदा शेख यांनी व्यक्त केला.
सर्व कुटुंबाचा हातभार
या कार्यात त्यांची मुले, जावई आणि नातवंडे खांद्याला खांदा लावून सहभागी होतात. प्रसाद वाटण्यापासून सजावटीपर्यंत प्रत्येक कामात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हातभार लावते. हा उत्सव आता केवळ एक धार्मिक सोहळा राहिला नाही, तर एक सामाजिक उत्सव बनला आहे. परिसरातील हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येतो, एकमेकांशी संवाद साधतो आणि खरा सामुदायिक व सासलोखा कसा असतो, याचे दर्शन घडते.