

मुंबई : गुन्ह्यांत मदतीसह विरोधकावर कारवाईसाठी लाचेची मागणी करून दोन लाख तीस हजार रुपयांची लाच घेताना वडाळा टी टी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोघांवर झालेल्या या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे एका व्यक्तीसोबत समाजाच्या हॉलवरून वाद सुरू होता. या वादातून दोन्ही लोकांनी एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. मात्र तक्रारदाराची तक्रार न घेता विरोधकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात तक्रारदाराच्या मुलीला आरोपी न करता तिला मदत करणे तसेच विरोधकावर कारवाई करण्यासाठी तपास अधिकारी उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांनी त्यांच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती.
त्यापैकी पाच लाख रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि स्वत:साठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी वरिष्ठांना चार लाख रुपये आणि त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले. यावेळी त्यांनी त्याच्याकडून वीस हजार रुपये घेतले होते. उर्वरित लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
दोन्ही अधिकारी अलगद जाळ्यात
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात सापळा लावला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना दोन लाखांचा पहिला तर उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना तीस हजाराचा दुसरा हप्ता घेताना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. अटकेनंतर या दोघांना लाचलुचतपत प्रतिबंधक विभागात आणण्यात आले होते. या कारवाईनंतर दोन्ही पोलीस अधिकार्यांच्या घरासह इतर ठिकाणी एकाच वेळेस कारवाई करण्यात आली. या कारवाईचा तपशील मात्र समजू शकले नाही.