

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल; मात्र यंदाच्या मतमोजणीत एकाचवेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता एकावेळी फक्त एका वॉर्डची मतमोजणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दुपारपर्यंत स्पष्ट होणारे निकाल रात्री उशिरापर्यंत तरी हाती येतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
मतमोजणी कोणत्या पद्धतीने करायची, याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणच्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात आता अंतिम निर्णय आल्यानंतरच सर्वठिकाणचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
एकावेळी केवळ एका वॉर्डचीच मतमोजणी करण्याचा निर्णय अंतिम झाला, तर ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरण्याची शक्यता आहे. एका वॉर्डची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी सरासरी एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. ज्या महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या मोठी आहे, तिथे निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या मोठ्या महापालिकांचे निकाल रात्री उशिरापर्यंतही प्रलंबित राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संभाव्य वाद, हरकती आणि गोंधळ यांमुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक जिकिरीची ठरू शकते. या पार्श्वभूमीवर मतमोजणीची नेमकी पद्धत आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, यासाठी महापालिकांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे समजते.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 प्रभाग आहेत. मुंबईत 23 विभागीय निवडणूक कार्यालयांंतर्गत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक कार्यालयांतर्गत 8 ते 10 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. टपाली मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. तथापि, एकावेळी एकच प्रभाग ही पद्धत राबवली गेली, तर संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.