

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा धुमधडाका सुरू असून, महाराष्ट्राचा नागरी भाग 15 तारखेला मतदानाला जाणार असल्याने आजअखेरच्या रविवारी प्रचार शिगेला पोहोचला होता. शहरांमधले सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि कोपरे छोट्या-मोठ्या सभांनी ढवळून निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वचननाम्यानंतर नाशिक गाठले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्रात प्रचार सुरू ठेवला. अजित पवार यांनी पुणे येथे मुक्काम ठेवून तेथे लक्ष दिले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात प्रचारावर भर दिला. उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर मराठी माणसाला साद घातली.
‘आवाज कुणाचा’, ‘ताई, माई, आक्का’ अशा घोषणा देत फिरणारे गट, लाऊडस्पीकर लावलेल्या रिक्षा तसेच सभा रविवारी जोरात सुरू होत्या. चौकसभा तसेच निवासी संकुलात जाऊन फिरणारे उमेदवार अशी सगळीकडे प्रचंड गर्दी झाली होती. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आज नोकरदारांना मिळालेली सुट्टी यामुळे राजकीय पक्षांनी रविवारचा दिवस प्रचारात घालवला. सकाळ, संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत प्रचार फेर्या झाल्या. प्रचार कालावधीतील उद्याचा शेवटचा दिवस कामाचा असल्याने रविवार सुट्टीचा शेवटचा उपयोगात आणला गेला. रजेचा उपयोग करून मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांनी उत्तम नियोजन केले. प्रचाराचा ‘सुपर संडे’ असल्याने छोटे-मोठे नेते अधिकाधिक लोकांना भेटत होते.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 48 तास आधी म्हणजे उद्या 13 जानेवारी रोजी थंडावणार आहे. शेवटच्या टप्प्यात भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांनी गाजणार असून, आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा खर्या अर्थाने धुरळा उडणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी सुट्टीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाऊन त्यांची भेट घेण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांची संयुक्त सभा दादरच्या शिवतीर्थावर झाली.
मुख्यमंत्र्यांचा पिंपरीत रोड शो
भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये सभा करून पिंपरी-चिंचवड गाठले. येथे त्यांचा रोड शो आयोजित केला गेला. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पनवेल आणि पुणे येथे जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत, तर एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीराभाईंदर येथे प्रचार केला. दि. 13 रोजी शिंदे-फडणवीस यांची मुंबईत शिवाजी पार्कवर, तर ठाकरे बंधूंची ठाणे येथे सभा होईल.
महानगरपालिका निवडणुकांसाठी सानपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो केला. तसेच बोरिवली येथे महायुतीच्या उमेदवार रेखा यादव यांच्या प्रचारासाठी बिहार भाजपच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी प्रचार सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेसाठी वचननामा प्रकाशित करण्यात आला.