

मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगर विकास विभागाने 23 जून 2025 रोजी प्रभाग रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नगरविकास खात्याकडून प्रभागरचना निश्चित करण्यासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आज २३ जून रोजी यासंदर्भात शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहे. आजच्या आदेशानुसार विविध तारखेनुसार विविध टप्प्यांमध्ये प्रभागरचना निश्चिती केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत, या प्रक्रियेत कोणत्याही सवलती किंवा विलंबाला परवानगी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणूका दिवाळीनंतर होतील हे स्पष्ट झाले आहे.
नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व महापालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या आदेशानुसार आता महापालिकांच्या निवडणूकपूर्व तयारीला गती मिळणार आहे. नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना, आरक्षण तसेच जनसुनावणीसंबंधीच्या प्रक्रिया सुरु होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार, ही प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग रचना निश्चित करताना लोकसंख्येची घनता, भौगोलिक रचना आणि आरक्षण यासारख्या घटकांचा विचार केला जाणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करणे
२५ ते ३१ जुलै २०२५
प्रारूप प्रस्ताव सादर करणे
६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५
प्रारूप रचना प्रसिद्ध करणे हरकती मागवणे
२२ ते २८ ऑगस्ट २०२५
हरकतींवर सुनावणी
२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५
अंतिम प्रभाग रचना सादर करणे
९ ते १५ सप्टेंबर २०२५
प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करणे
१६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५
निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्ध करणे
३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर