

ठळक मुद्दे
भटक्या श्वानांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा दिलायादायक निर्णय
बंगळुरू येथील आश्रया ट्रस्ट सामाजिक संस्थेने रुग्णालयासाठी ९० लाखांचा निधी दिला
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच एक दिलासादायक निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील रेल्वे स्टेशनजवळील उड्डाण पुलाखाली भटक्या श्वानांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी बंगळुरू येथील आश्रया ट्रस्ट या सामाजिक संस्थेने ९० लाखांचा निधी दिला आहे. या रुग्णालयाचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. दरवर्षी शेकडो नागरिकांना या भटक्या कुत्र्यांच्या त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा दुचाकीस्वारांच्या मागे लागल्याने अपघात देखील झाले आहेत. काही जण विनाकारण श्वानांना दगडाने मारहाण करतात.
यातील काही प्राणी आजारी, जखमी किंवा आक्रस्ताळलेले असतात, जे इतर प्राण्यांना व नागरिकांनाही धोका निर्माण करतात. अशा भटक्या श्वानांसाठी रुग्णालय उभारण्यासाठी बंगळुरू येथील आश्रया ट्रस्टने ९० लाखांचा निधी दिला आहे.
त्यामुळे रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाखाली महापालिकेकडून एक विशेष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे स्वतंत्र दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली आहे. तसेच हे रुग्णालय महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत चालवले जाणार आहे.
रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाखालील या रुग्णालयासाठी आश्रया ट्रस्टने दिलेल्या ९० लाखांच्या निधीतून सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचा उद्देश म्हणजे शहरातील भटक्या श्वानांना वेळेवर वैद्यकीय उपचार देणे, त्यांचे लसीकरण करणे तसेच प्रसंगी त्यांचे निर्भतीकरण करून संख्येवर नियंत्रण ठेवणे. भटक्या प्राण्यांसाठी हे शहरातील पहिले रुग्णालय असणार आहे. या ठिकाणी श्वानांसाठी ऑपरेशन थिएटर, प्राथमिक उपचार कक्ष, पुनर्वसन सुविधा तसेच पोषण आहार केंद्र उपलब्ध राहाणार आहे. या रुग्णालयामुळे कुर्त्यांवर नियोजनबद्ध उपचार करता येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार असल्याचेही जी. श्रीकांत यांनी सांगितले.