मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची सोनसाखळी लंपास

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची सोनसाखळी लंपास
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाकाबंदी आणि तपासणी सुरु असल्याचे सांगून लुटारुंनी माझगावमधील एका ५२ वर्षीय महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझगावमध्ये राहाणाऱ्या आशा (५२) या नेहमीप्रमाणे सकाळी नातेवाईक महिलेसोबत चालण्यासाठी घराबाहेर पडल्या. शिवदास चापसी मार्गावरुन जात असताना दोघांनी त्यांना अडवले. यातील एकाने पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र आशा यांना दाखविले. त्यानंतर त्याने येथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाकाबंदी सुरु आहे. तुम्ही सोन्याचे दागिने घालून कशाला बाहेर फिरत आहात. दागिने काढून द्या, मी तुम्हाला कागदात गुंडाळून देतो असे त्याने आशा यांना सांगितले. सुरुवातीला आशा यांनी दागिने काढून देण्यास नकार दिला. मात्र त्या व्यक्तीने अशाप्रकारेच एका व्यक्तीला थांबवून त्याला सोनसाखळी काढायला सांगितली. त्या व्यक्तीने सोनसाखळी काढून ती पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीकडे दिली. त्यानंतर मात्र आशा यांनीही आपल्या गळ्यातील १७ ग्रॅम वजानाची सोनसाखळी काढून त्या तोतया पोलिसाकडे दिली.

सोनसाखळी पेपरमध्ये गुंडाळून देण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने ती लंपास केली. त्यानंतर त्याने सोनसाखळी गुंडाळलेला एक कागद आशा यांच्याकडे दिला आणि ते निघून गेले. त्यानंतर काही अंतर पूढे चालत जात एका बसथांब्याजवळ उभे राहून आशा यांनी आपल्याजवळी कागद तपासला असता त्यात बेन्टेक्स धातूची खोटी सोनसाखळी होती. त्यानंतर मात्र त्या तोतया पोलिसांनी आपल्याला बोलण्यात गुंतवून सोन साखळी लंपास केल्याची आशा यांची खात्री पटली. अखेर आशा यांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून ७० हजार रुपये किंमतीच्या १७ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळी चोरीची तक्रार दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news