

मुंबई :मंगळवारी पाणी येणार नाही, याची महापालिका प्रशासनाने कल्पना देऊनही नियोजन न केल्याने मुंबईकरांचे पाण्याविना चांगलेच हाल झाले. ए, बी, सी, ई, एफ.दक्षिण, एफ.उत्तर, एल आणि एन वॉर्डात पाणीपुरवठा पूर्णत: बंद होता.
भूमिगत बोगदा शाफ्ट जोडणीसाठी 3000 मिलीमीटर जलवाहिनीवर 2500 मिलीमीटर जलवाहिनीची छेद जोडणीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून हे काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी 11 विभागांमध्ये काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणी आलेच नाही. त्यामुळे पाणी साठवून न ठेवलेल्या मुंबईकरांचा मंगळवार आंघोळीविना गेला.
घरातील इतर कामेही गृहिणींना करता आली नाहीत. हे काम मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काम लांबले. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र जलवाहिनीत पाणी पूर्णपणे भरण्यासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो. यामुळे पहाटेपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
तक्रारींचा पाऊस
पाणी न आल्याने महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात 9116 या नंबरवर मंगळवारी सकाळपासून नागरिकांच्या तक्रारींचे कॉल येणे सुरू झाले. दिवसभर फोनची रिंग वाजतच होती. तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला. पाणी कधी येणार याचे उत्तर देताना कक्षातील कर्मचारी दिवसभर मेटाकुटीस आले होते.
आज पाणीपुरवठा होणार सुरळीत
जलवाहिनी जोडणीचे काम तांत्रिक कारणांमुळे लांबल्याचा संदेश मंगळवारी दुपारनंतर मुंबईकरांच्या मोबाईलवर आल्यानंतर मंगळवारी पाणी येणार की नाही याची शक्यता वाढल्याने मुंबईकरांचा पारा चांगलाचा चढला होता. मात्र महापालिका प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करून बुधवारी पहाटे पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले आहे.
या विभागात पाणी आले नाही
ए, बी, सी, ई, एफ.दक्षिण, एफ.उत्तर, एल आणि एन वॉर्डात पाणीपुरवठा झाला नाही
या विभागात कमी दाबाने पुरवठा
एम.पूर्व, एम.पश्चिम आणि एस विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
पूर्व उपनगरांत पाणीबाणी
मुंबई : जलवाहिनीच्या छेद जोडणी कामामुळे चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द, गोवंडी आणि घाटकोपर या भागांत थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिक अक्षरशः हताश होऊन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत होते. काहींना जेवणासाठीही पाणी विकत आणावे लागले. झोपडपट्टी परिसरात परिस्थिती आणखी गंभीर होती. खारदेवनगर, सुभाषनगर, पी.एल. लोखंडे मार्ग, वाशी नाका, माहुल, पांजरापोळ, अणुशक्तीनगर आणि ट्रॉम्बे-गोवंडी भागात पाणी साठवण्यासाठी पुरेशा टाक्या नसल्याने त्यांचे हाल झाले.
घरात स्वयंपाक, भांडी आणि कपड्यांचा ढिगारा पडून होता. पत्रावळींचा वापर करावा लागला. पैसे मोजूनही पाण्याचे टँकर मिळाले नाहीत. दरम्यान रात्री साडेदहा वाजता कुर्ला, गोवंडी, चेंबूरच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे येथील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला.