

मुंबई :तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात पाणीसाठ्यात तब्बल दिड लाख दशलक्ष लिटर्सने वाढ झाली आहे. म्हणजेच शहराला ३५ ते ३६ दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.
पाऊस लांबल्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. अप्पर वैतरणा व तानसा तलावातील पाणीसाठा शून्यावर पोहचला होता. पण गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे तलावातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. ३० जूनला सर्वच तलावातील पाणीसाठा ९७ हजार ६६६ दशलक्ष लिटर इतका खाली आला होता. आता त्यानंतर पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस दाखल झाल्यामुळे अवघ्या सहा दिवसात पाणीसाठा २ लाख ४४ हजार ९०० दशलक्ष लिटर पर्यंत पोहचला आहे. म्हणजे जवळपास दिड लाख दशलक्ष लिटर पाण्यामध्ये वाढ झाली आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. ३० जूनला या तलावातील पाणीसाठा ३७ हजार ३९७ दशलक्ष लिटर इतका खाली गेला होता. गेल्या सहा दिवसात या तलावातील पाणीसाठा १ लाख १ हजार २६४ दशलक्ष लिटर पर्यंत पोहचला आहे. या तलावामध्ये ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. जी अन्य तलावाच्या तुलनेत सुमारे चार ते पाच पट जास्त आहे.
तलावातील पाणीसाठा १७ टक्केवर पोहचला असला तरी २०२५ च्या तुलनेत तो ४३ टक्केने कमी आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणात तलावातील पाणीसाठा वाढू लागला असून शून्यावर गेलेला पाणीसाठा आता ११ हजार दशलक्ष लिटर पर्यंत वाढला आहे.