

मुंबई : तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असून थेंबे थेंबे पाणी साचत आहे. गेल्या दोन दिवसात पाणीसाठ्यात २० हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भातसा तलावातील पाणीसाठाही वाढू लागल्यामुळे महापालिकेसह मुंबईकरांचे टेन्शन थोडे हलके झाले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे तळ गाठलेल्या तलावातील पाणी साठ्यात आता वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भातसा तलावातील पाणी साठ्यात तब्बल ५,५०० दशलक्ष लिटर म्हणजेच मुंबई शहराला दीड दिवस पुरेल, इतक्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे.
अन्य तलावातील पाणीसाठ्यातही आता वाढ होत असून शून्यावर पोचलेल्या तानसा तलावातील पाणीसाठा आता वाढू लागला आहे. मुंबई शहरात विशेषत: उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तुळशी व विहार तलावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. विहारमधील पाणीसाठा ५७ टक्क्यांवर पोहचला आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रात गेल्या २४ ते २२ ते ७० मिमी पाऊस झाला. त्या तुलनेत विहार व तुळशी तलावामध्ये १९५ मिमी व २०७ मिमी पाऊस झाला. तलावांमधील एकूण पाणीसाठा आता १ लाख १७ हजार ५३२ दशलक्ष लीटरवर पोहचला आहे. तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणी साठ्यात येणाऱ्या काही दिवसात मोठी वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केला.
२ जुलै तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा -० (० टक्के)
मोडक सागर - २८,८१४ (२२.३५ टक्के)
तानसा -५,२१६ (३.६० टक्के)
मध्य वैतरणा -२३,९५० (१२.३८ टक्के)
भातसा -४०,९८३ (५.५२ टक्के)
विहार -१५,८३७ (४५.१३ टक्के)
तुळशी -२,७३३ (३३.९६ टक्के)