

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. समुद्रमार्गे प्रवास करणे आता स्वप्न राहणार नाही, तर प्रत्यक्षात साकार होणार आहे. मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले असून, आगामी तीन महिन्यांत विकास आराखडा सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी पूर्वतयारी म्हणून कोची मेट्रो रेल लिमिटेड या संस्थेला अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आज मंत्रालयात या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नितेश राणे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे सीईओ पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये आणि कोची मेट्रोचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राणे म्हणाले, "मुंबईतील बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या भागांमध्ये जल वाहतुकीच्या मोठ्या संधी आहेत. या भागांना जोडणारे जलमार्ग विकसित करून वॉटर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. या मार्गांची निवड करताना प्रवाशांची संख्या आणि फायदेशीरता याचा विचार करावा."
वॉटर मेट्रोच्या तिकीटदराबाबतही राणे यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, ते सामान्य नागरिकांच्या आवाक्यात असावेत. तसेच, जेटी आणि टर्मिनल्सचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करून त्यांना इतर वाहतुकीच्या साधनांशी जोडले जावे.
अहवालानुसार वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत सुरुवातीस 29 टर्मिनल्स उभारण्यात येणार असून 10 जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी युक्त जेटी, बोटींची खरेदी, तिकीट प्रणाली, इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. एकूण अंदाजे ₹2500 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे.
वॉटर मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास, मुंबईतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना जलद, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे.