

मुंबई : पाण्याची होणारी गळती थांबवण्यासह जलवाहिन्यांची जोडणी यासाठी सतत पाणीकपात केली जात आहे. त्यामुळे तलावांत मुबलक पाणीसाठा असूनही मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या सततच्या पाणीकपातीमुळे मुंबईकर गेल्या महिनाभरापासून अक्षरश: त्रस्त झाले आहेत.
जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन जलवाहिन्या टाकण्यासह जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असल्यामुळे जलजोडणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात पाणीकपात लागू करून जलवाहिन्या जोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागला. 22 ते 26 डिसेंबरपर्यंत पुन्हा पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलजोडणी व गळती थांबवण्यासाठी पाणीकपात लागू करावी लागणार असली तरी नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने अन्य पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
मुंबईतील ज्या भागांत पाणीकपात करण्यात येणार आहे, त्या भागातील नागरिकांना अवगत केले जात असले तरी, पाण्याची पुरेशी पर्यायी व्यवस्था केली जात नाही. पाणीकपात होणाऱ्या भागांमध्ये पुरेसे पाण्याचे टँकर ठेवण्यासह अन्य जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करता येईल का, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे टँकर कमी पडत असतील, तर महापालिकेने ते भाडेतत्त्वावर घ्यावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. रस्ते धुण्यासाठी टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात येत असतील, तर पाणीकपातीच्या काळात असे टँकर भाडेतत्त्वावर का घेण्यात येत नाहीत, असा सवालही आता मुंबईकरांनी थेट महापालिका आयुक्तांना केला आहे.
टँकरची पर्यायी व्यवस्था करणे शक्य
मुंबईतील ज्या भागात पाणी टंचाई बसणार आहे त्या भागात टँकरची परवाही व्यवस्था करणे शक्य आहे. मात्र पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. नागरिकांच्या मागणीनुसार मुंबई महापालिका टँकर उपलब्ध करून देते मात्र टँकरची कमतरता असल्यामुळे प्रत्येकाला टँकर वेळेत उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.