

Mumbai Water Cut Ganesh Festival : ऐन गणेश उत्सवात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये १३ लाख ८८ हजार ४२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असून तलावांची पातळी एकूण क्षमतेच्या ९५.९३ टक्क्यांवर, म्हणजेच जवळपास ९६ टक्क्यांवर पोचली आहे. मात्र, सप्टेंबरच्या पावसाचा वेध घेऊनच पाणीकपातीबाबतचा निर्णय घेण्याची पालिकेची भूमिका आहे.
भांडुप येथील मास्टर कंट्रोल सेंटरच्या अहवालानुसार विहार तलाव १०० टक्के, मोडक सागर ९९.९९ टक्के, तानसा ९८.३३ टक्के, मध्य वैतरणा ९८.०८ टक्के आणि तुळशी ९७.९२ टक्के भरला आहे. भातसा तलावात ९५.९१ टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये ८९.७६ टक्के साठा आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईसमोर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते.
जूनमध्ये तलावांतील एकत्रित साठा सात टक्क्यांच्या आसपास घसरला होता आणि त्यामुळे १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे अवघ्या काही आठवड्यांत तलाव तुडुंब भरण्यास सुरुवात झाली होती. असं असलं तरी प्रशासन खरबरदारीचा उपाय म्हणून सुरू असलेल्या १० टक्के पाणी कपातीबाबत ही सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडतो ते पाहूनच निर्णय घेणार आहे.
भातसा ९५.९१
अप्पर वैतरणा ८९.७६
मोडक सागर ९९.९९
तानसा ९८.३३
मध्य वैतरणा ९८.०८
विहार १००
तुळशी ९७.९२