Mumbai Lake Water Level
मुंबई : मुंबई मे महिन्यांत कोसळलेल्या पावसाने मात्र जून महिन्यांत विश्रांती घेतल्याने तलावांतील पाणीसाठा कमी होवू लागला असून, तलावांत फक्त 10 टक्के पाणी शिल्लक आहे. येत्या तीन दिवसांत राखीव पाणी साठ्याचा वापर सुरु केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
आधीच मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने मारलेली दडी आणि त्यात उकाड्यामुळे वाढलेले बाष्पीभवन यामुळे तलावांतील पाणीसाठा आटत चालला आहे.
मंगळवार सकाळपर्यंत तलावांमधील 10.07 टक्क्यांवर पाणीसाठा आला आहे. मागील वर्षी 10 टक्केवर पाणीसाठा आल्यावर पालिकेने पाणी कपात केली होती. मात्र यावेळी पालिकेने अशी वेळ आली तर राज्य सरकारच्या धरणातील राखीव साठा वापरण्याची परवानगी आधीच घेतली आहे. तूर्तास पाणीकपात न करता येत्या दोन - तीन दिवसांत राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली जाणार आहे.
गेल्यावर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सात तलावांतील पाणीसाठा 25 मे रोजी 1,21,419 दशलक्ष लिटर म्हणजेच 8.39 टक्के इतका शिल्लक होता. हा पाणीसाठा त्यावेळी पुढील 29 दिवसांचा म्हणजेच जून 2024 पर्यंत पुरेल इतका होता. सदर पाणीसाठा पाहून महापालिकेने 25 मे रोजी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेसह ठाणे,भिवंडी, निजामपूर क्षेत्रात 30 मे 2024 पासून 5 टक्के तर 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लादली होती.
मात्र जुलै 2024 या महिन्यात सात तलावात जोरदार पाऊस पडल्याने 25 जुलै 2024 पर्यंत सात पैकी चार तलाव भरून वाहू लागले होते. त्यावेळी सात तलावांत मिळून 9,66,395 दशलक्ष लिटर (66.77 टक्के) म्हणजे पुढील 241 दिवस पुरेल इतका जमा झाला होता. त्यामुळे महापालिकेने 25 जुलै 2024 रोजीच मुंबईतील 10 टक्के पाणी कपात 29 जुलै 2024 पासून रद्द करण्याची घोषणा केली होती.