

मुंबई: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट गडद होत असल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. पर्याय म्हणून विहिरींची स्वच्छता प्रशासनाने होती घेतली असून तेथून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. दुसरा पर्याय म्हणून शहरातील बोअरवेलची आठवणही प्रशासनाला झाली आहे. पाणी कमी पडल्यास बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
नगरसेवक निधीतून बोअरवेल घेण्याचे नियोजन आहे. यामुळे त्या-त्या विभागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.
मुंबई शहर व उपनगरात सुमारे १० ते १२ हजारांपेक्षा जास्त विहिरी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षात काही विहिरी विकास कामांमुळे पूर्णपणे बुजल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाणीटंचाईमुळे खोदण्यात आलेल्या बोरवेलची दुरुस्ती व साफसफाई केली जाणार आहे.
बोरवेलला पाणीउपसा पंप लावून ते पाणी आजूबाजूच्या परिसरात पुरवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत सर्वे करण्यात येत आहे.
नगरसेवक निधीतूनही बोरवेल खोदण्यासाठी परवानगी देण्याचा विचार मुंबई महापालिकेचा आहे. बोरवेल खोदल्यास बोरवेलची संख्या वाढून पिण्याव्यतिरिक्त कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकते असा विश्वास पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
२० ते २५ फुटांवर मुबलक पाणी
मुंबई शहर व उपनगरात २० ते २५ फुटावर पाणी लागते. पण बोअरवेलची खोली ४० ते ५० फुटांपेक्षा जास्त केल्यास मुबलक पाणी मिळू शकते. विशेष म्हणजे एका बोअरवेलवर १५ ते २० कुटुंबांना पिण्या व्यतिरिक्त वापरासाठी पाणी मिळू शकते.
महापालिकेची परवानगी बंधनकारक
जमिनीखालून अनेक केबल जात असून जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, व पर्जन्य जलवाहिन्यांचेही जाळे आहे. त्याशिवाय भूमिगत मेट्रोही जात आहे. त्यामुळे बोअरवेल खोदण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.