

मुंबई: अंधेरीतील एका ज्वेलर्स कंपनीच्या सुमारे ६० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी कंपनीच्या कर्मचार्यासह त्याच्या सहकार्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
अविनाश गंगाधर कदम आणि मनोज हणमंत जोगदंड अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून गुन्ह्यांतील सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अपघाताचा बनाव करुन या दोघांनी दागिन्यांचा अपहार केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.
अंधेरी येथे गोल्ड स्टार इलिट ज्वेलर्स कंपनीचे कार्यालय असून तिथेच तक्रारदार वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या कंपनीत दुसर्या कंपनीकडून कच्चा माल पाठविला जातो. त्यानंतर तिथे विविध सोन्याचे, हिर्यांचे दागिने बनवून संबंधित कंपनीला पाठविले जाते.
६ जूनला सायंकाळी संजय मांडवकर यांनी एका कंपनीचे ६० लाख ६५ हजार ६५२ रुपयांचे विविध सोन्याचे दागिने डिलीव्हरीसाठी अविनाश कदम याला दिले होते. मात्र डिलीव्हरी गेलेला अविनाश हा बराच वेळ होऊन परत आला नव्हता. चौकशीनंतर त्याचा भंगारगल्लीत अपघात झाला असून तो बेशुद्ध झाला आणि दागिने असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केल्याचे समजले.
जखमी अविनाशला सुरुवातीला कामगार आणि नंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे चौकशी केल्यानंतर त्याने अपघाताची माहिती सांगून दागिने अज्ञात व्यक्तीने पळविल्याचे सांगितले. त्याच्याशी बोलताना तक्रारदारांना त्याचे एकूणच वर्तन संशयास्पद वाटत होते. त्याला गंभीर दुखापत झाली नव्हती.
तरीही तो रुग्णालयात ऍडमिट राहण्याचा आग्रह करत होता. संशय वाटल्याने त्यांनी कंपनीच्या वतीने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. अपघाताच्या ठिकाणाचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एक तरुण तिथे बराच वेळ संशयास्पद फिरताना दिसून आला.
हाच धागा पकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक किरण पर्बत, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, कदम, शिंदे, पवार, विशाल पिसाळ यांनी संबंधित संशयित व्यक्ती मनोज जोगदंड याला ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीत त्यानेच अविनाशसोबत अपघाताचा बनाव करुन कंपनीच्या सुमारे ६० लाख ६६ हजार रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्यासह कंपनीचा कर्मचारी अविनाश कदम या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.