

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी पदवीधारकांच्या वाढत्या संख्येत वाढ झाली असून यंदा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात यंदा तब्बल 577 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 43 टक्यांनी वाढ झाली आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार संशोधनसंस्कृती बळकट करण्यावर विद्यापीठाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यात आले असून, हे संशोधन उद्योगजगत आणि समाजाच्या गरजांशी जोडले जावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
गेल्या वर्षी 401 विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली होती. त्याच्या तुलनेत यंदा 176 जणांची भर पडली असून, संशोधन क्षेत्रातील विद्यापीठाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांचा विचार करता मुंबई विद्यापीठातील पीएचडी धारकांची संख्या वाढली आहे. 2020-21 मध्ये विद्यापीठातून केवळ 153 विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली होती. त्यानंतर 2021-22 मध्ये ही संख्या 211, 2022-23 मध्ये 367, तर 2023-24 मध्ये 428 इतकी वाढली.
2024-25 मध्ये संख्या काहीशी घसरून 401 वर आली होती; मात्र यंदा पुन्हा एकदा पीएचडी धारकांची संख्या मोठी आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच 577 विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली असून, पुढील काही आठवड्यांत आणखी सुमारे 50 विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दीक्षान्त समारंभाच्या वेळी ही संख्या 625 च्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे.
दीक्षान्त समारंभ 17 जानेवारीला
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभ येत्या 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत, केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी उपस्थिती राहणार आहेत.