

University Scholarship
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणार्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे करत रुपये 2 कोटी 74 लाख 16 हजारांचे अर्थसहाय्य केल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविल्या जणार्या पुस्तक पेढी योजनेअंतर्गत संलग्नित महाविद्यालयातील 27 हजार 471 आणि शैक्षणिक विभागातील 57 विद्यार्थ्यांसाठी मदत व अर्थसहाय्य करण्यात आले. या योजनेअंतर्गत एकूण 1 कोटी 6 लाख 14 हजार 840 रुपये विद्यार्थ्यांना देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरजू व मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 198 व शैक्षणिक विभागातील 22 विद्यार्थ्यांना 6 लाख 38 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
तिसर्या योजनेअंतर्गत महाविद्यालयात शिकणार्या अनुसूचित जमातीच्या 1,950 विद्यार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 73 हजार 500 रुपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये अर्ज केलेल्या 21 महाविद्यालयातील 1103 मुले आणि 847 मुलींचा समावेश आहे. तर चौथ्या योजनेअंतर्गत विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागात शिकणार्या 120 एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना 60 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठात शिकणार्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अधिकाधीक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. विद्यापीठाने नेहमीच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ