

डोंबिवली : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील बोधचिन्हामध्ये "Mumbai" या इंग्रजी स्पेलिंगमध्ये "Mumabai" अशी चूक झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. अशी चुकीची प्रमाणपत्रे अनेक महाविद्यालयांना पोहोचली असून, त्यामुळे मुंबई विद्यापीठाची नामुष्की झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव तथा आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य तथा भिवंडी लोकसभेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर व युवासेना कल्याण लोकसभा जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील विविध महाविद्यालयांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये डोंबिवलीत प्रगती, जी. आर. पाटील, साऊथ इंडियन, मंजुनाथ, मॉडेल, के. व्ही. पेंढरकर, स्वामी विवेकानंद, मढवी, आदी महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्य अधिकाऱ्यांना चुकीची प्रमाणपत्रे परत जमा करून ती विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी आम्ही महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याध्याऱ्यांना दिलेल्या निवेदनांद्वारे मुंबई विद्यापीठाचे लक्ष वेधल्याचे शिवसेनेच्या ग्रामीण विभागाचे उपजिल्हाप्रमुख राहूल भगत यांनी सांगितले.
या आंदोलनात शिवसेना ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहूल भगत यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी स्वप्नील पावशे, परेश काळण, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, विधानसभा समन्वयक पंकज माळी, उपविधानसभा अधिकारी ऋतुनील पावसकर, तालुका अधिकारी जयेश पाटील, उपतालुका अधिकारी आवेश गायकर, युवा शहर अधिकारी प्रसाद टुकरूल, युवती शहर अधिकारी रिचा कामतेकर, युवासेना शहर समन्वयक मंदार गुरव, ज्योती पाखरे, उपशहर अधिकारी सुदर्शन जोशी, जागृती माळी, यश सोनी, तन्वी सावंत, विराज पाटील, रजत पाटील, वरूण चव्हाण, यश कदम, प्रणव सावंत, पराग पाटील, सचिन पाटील, राजेश ठाकरे, विघ्नेश काळे, विपुल घोलप, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.