Mumbai University Billionaires : मुंबई विद्यापीठाने दिले सर्वाधिक अब्जाधीश!

जगातील दहा विद्यापीठांत समावेश, 31 श्रीमंतांकडे 232 अब्ज डॉलरची संपत्ती
Mumbai University Billionaires
मुंबई विद्यापीठाने दिले सर्वाधिक अब्जाधीश!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : सर्वाधिक अब्जाधीश घडविणाऱ्या जगातील आघाडीच्या 10 विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने स्थान मिळविले आहे. मुंबई विद्यापीठाने 31 अब्जाधीश दिले असून, त्यांची एकत्रित संपत्ती 232 अब्ज डॉलर आहे. प्रत्येकाकडे सरासरी साडेसात अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

ह्युमनाइझ एआयने जगभरातील 3,184 अब्जाधीशांचे विश्लेषण केले. त्यात असे आढळून आले की, मुंबई विद्यापीठातून शिकलेले 31 माजी विद्यार्थी अब्जाधीश आहेत. यामुळे हे विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्‌‍स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि येल विद्यापीठ यांसारख्या संस्थांच्या बरोबरीने जागतिक स्तरावर 10 व्या स्थानावर आहे.

Mumbai University Billionaires
अर्थवार्ता : गुगलचा भारतात 'एआय' धमाका! विशाखापट्टणम येथे 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा

या अभ्यासानुसार, मुंबई विद्यापीठातील अब्जाधीशांच्या संपत्तीचा मोठा भाग ऊर्जा, दूरसंचार, किरकोळ विक्री आणि विविध कौटुंबिक व्यवसायांसारख्या क्षेत्रांतील मोठ्या भारतीय उद्योगसमूहांमधून येतो. या निष्कर्षांमुळे भारताला जगातील सर्वांत मोठ्या अब्जाधीश शिक्षण परिसंस्थांपैकी एक म्हणूनही स्थान मिळाले आहे. अहवालानुसार, भारतात अब्जाधीश घडविणारी 29 विद्यापीठे आहेत. अशी सर्वाधिक विद्यापीठे असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका (195) आणि चीन (59) यांच्यानंतर भारत हा तिसरा सर्वांत मोठा देश ठरला आहे. जगभरातील अब्जाधीश घडविणाऱ्या विद्यापीठांमध्ये भारताचा वाटा 6.08 टक्के आहे.

अहवालानुसार, भारताचे संपत्तीनिर्मितीचे मॉडेल अमेरिका आणि चीनपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अमेरिकन विद्यापीठे व्हेंचर कॅपिटल, स्टार्टअप्स आणि वित्तीय बाजारांशी मोठ्या प्रमाणावर जोडलेली आहेत. तर, चिनी संस्था देशाची डिजिटल अर्थव्यवस्था, फिनटेक आणि ई-कॉमर्सच्या तेजीशी निगडित आहेत. याउलट, भारत प्रामुख्याने पारंपरिक उद्योगसमूह, औद्योगिक व्यवसाय, दूरसंचार, पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन कौटुंबिक मालकीच्या उद्योगांच्या माध्यमातून अब्जाधीशांची संपत्ती निर्माण करीत आहे.

हे आहेत मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी...

मुंबई विद्यापीठातील अब्जाधीशांकडे जागतिक अब्जाधीशांच्या एकत्रित संपत्तीतील वाटा 1.71 टक्के आहे. मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज), कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला ग््रुाप), राधाकिशन दमाणी (डी मार्ट) हे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

Mumbai University Billionaires
अर्थवार्ता : भारत-अमेरिका चर्चा आणि स्टारलिंकची एंट्री!

हार्वर्ड विद्यापीठ अव्वल...

हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेले 134 माजी विद्यार्थी अब्जाधीश आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांची एकत्रित संपत्ती तब्बल 1.235 लाख कोटी डॉलर आहे. म्हणजेच, जागतिक अब्जाधीशांच्या संपत्तीमधील 10 पैकी 1 डॉलर हार्वर्डच्या विद्यार्थ्यांचा आहे. प्रामुख्याने तंत्रज्ञान, वित्त आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या या माजी विद्यार्थ्यांची दरडोई सरासरी संपत्ती 9.22 अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तरावर केवळ तीन विद्यापीठांनी हार्वर्ड, स्टॅनफर्ड आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित संपत्तीने एक लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

असे आहे अब्जाधीशांचे क्षेत्र

जगभरातील 3,184 अब्जाधीशांपैकी 1,118 (35.11) टक्के वित्तीय व्यवस्थापनाशी संबंधित उद्योगात आहेत. तर, 434 अभियांत्रिकी उद्योग, 192 नॅचरल सायन्स, 153 कायदा, 137 संगणकशास्त्र, 134 सामाजिक शास्त्र, 75 वैद्यकीय आणि आरोग्याशी निगडित क्षेत्रात कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news