

* गतसप्ताहात शुक्रवारच्या दिवशी निफ्टीमध्ये 148.40 अंकांची वाढ नोंदवली गेली असून, निर्देशांक 26,046.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये 0.57% टक्क्यांची वाढ झाली. तसेच सेन्सेक्समध्ये एकूण 449.53 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 85,267.66 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 0.53% टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
* केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला वेग मिळाल्याचे चित्र दिसत असून, मंत्रिमंडळाने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यासोबतच नागरी अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्यास अनुकूल निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या पावलांमुळे गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्तहोत आहे. दरम्यान, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मजुरीत सुमारे 25 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, ग्रामीण भागातील उत्पन्न वाढीस हातभार लागणार आहे. अणुऊर्जा क्षेत्रात एनटीपीसीकडून मोठ्या प्रकल्पांसाठी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकूणच या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग कायम राखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.
* नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ऑक्टोबरमधील नीचांकी पातळीवरून वाढत 0.71 टक्क्यांवर पोहोचला असून, तो रिझर्व्ह बँकेच्या सहनशील मर्यादेतच राहिला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमतीत घट सुरूच राहिल्याने सलग सहाव्या महिन्यांत अन्न महागाई नकारात्मक नोंदली गेली आहे. भाजीपाल्याच्या किमतींमध्ये नरमाई दिसून आली असून, त्यामुळे एकूण महागाईवर नियंत्रण राहण्यास मदत झाली. मात्र, अन्नबाह्य घटकांतील काही वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाईत किंचित दबाव कायम आहे. तरीही एकूण महागाई दर कमी पातळीवर असल्याने आगामी काळात व्याजदर कपातीची शक्यता बळावल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. महागाईतील हा कल कायम राहिल्यास आर्थिक वाढीस पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज व्यक्तकरण्यात येत आहे.
* भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 90.42 रुपये प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गुरुवारच्या तुलनेत रुपया सहा पैशांनी कमजोर झाला. शुक्रवारी व्यवहारादरम्यान भारतीय चलन 90.56 रुपये प्रति डॉलर स्तरापर्यंत पोहोचले होते. सलग दुसर्या सत्रात रुपयावर दबाव कायम राहिला असून, जागतिक स्तरावरील डॉलरची मजबुती आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री हे प्रमुख कारण ठरले आहे. वाढते आयात खर्च आणि चालू खात्यातील तुटीमुळे चलनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, रुपयातील तीव्र चढ-उतार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बाजारात हस्तक्षेप केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, पुढील काळात रुपयाची घसरण मर्यादित असली तरी दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भांडवली प्रवाहांवर रुपयाची दिशा अवलंबून राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
* भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला. या चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी ‘सकारात्मक’ असे संबोधत द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीचा आढावा घेतल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा करत जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी सहकार्य सुरू ठेवण्यावर भर दिला. दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेने भारताच्या प्रस्तावावर समाधानी असल्यास करारावर स्वाक्षरी करावी, असे स्पष्ट मत व्यक्तकेले. भारताने चर्चांमध्ये दिलेला प्रस्ताव आतापर्यंतचा सर्वोत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या काळात व्यापार कराराबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर व्यक्तकेली जात आहे.
* नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयूएम) 80 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून, नवा उच्चांक नोंदवला आहे. इक्विटी योजनांमध्ये झालेल्या मजबूत गुंतवणुकीमुळे ही वाढ घडून आली असून विशेषतः मल्टिकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप योजनांमध्ये लक्षणीय प्रवाह दिसून आला. एसआयपी गुंतवणूक स्थिर राहिल्याने उद्योगाला दीर्घकालीन आधार मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बाजारातील चढ-उतार असूनही गुंतवणूकदारांचा इक्विटीकडे कल कायम राहिल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
* अॅमेझॉनने भारतातील गुंतवणूक वाढवत एकूण गुंतवणूक सुमारे 35 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेल्याची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित डिजिटलायझेशन, निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांवर या गुंतवणुकीचा भर राहणार आहे. 2030 पर्यंत भारतात सुमारे 10 लाख अतिरिक्तरोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा अॅमेझॉनने व्यक्तकेली आहे. क्लाऊड सेवा, लॉजिस्टिक्स, डिजिटल पायाभूत सुविधा आणि कौशल्यविकास यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतीय विक्रेत्यांच्या निर्यातींना चालना मिळून एकत्रित निर्यात 80 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतातील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे उद्योगतज्ज्ञांचे मत आहे.
* बँकिंग क्षेत्रात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दिल्या जाणार्या कर्जात यावर्षी मोठी वाढ झाली असून, हे कर्जवाटप सुमारे 27 टक्क्यांनी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मार्च 2025 नंतर बँकांनी एमएसएमई कर्जावर विशेष भर दिल्याने या क्षेत्रातील उद्योगांना भांडवल उपलब्धतेत मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मागील पाच वर्षांत सुमारे 6.15 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे राईट-ऑफ केल्याची माहिती सरकारने दिली आहे. हे राईट-ऑफ बँकिंग व्यवस्थेतील स्वच्छता प्रक्रियेचा भाग असून, कर्जमाफी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्जवाढ आणि जुन्या थकबाकीच्या साफसफाईमुळे बँकांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
* ब्लॅकरॉकच्या ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सने आदित्य बिर्ला रिन्यूएबल्समध्ये सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीच्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांचा विस्तार होऊन सौर आणि हायब्रिड ऊर्जाक्षेत्रात क्षमतावाढ होण्याची अपेक्षा आहे. भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
* एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंकने भारतात उपग्रह आधारित इंटरनेट (सॅटॅलाईट इंटरनेट) सेवेला सुरुवात केली असून, मासिक शुल्क सुमारे 8,600 रुपये आणि हार्डवेअरकरिता एकरकमी सुमारे 34,000 रुपये आकारले जाणार आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर असून, पारंपरिक दूरसंचार सेवांना यामुळे कडवी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही सेवा अद्याप नियामक मंजुरीच्या प्रक्रियेत असून, दरांबाबत अंतिम स्पष्टता अपेक्षित आहे.
* 5 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात लक्षणीय वाढ नोंदली गेली असून, साठा 1.033 अब्ज अमेरिकी डॉलर्सने वाढून 687.26 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. ही वाढ प्रामुख्याने सोन्याच्या साठ्यात 1.188 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्यामुळे झाली आहे. मात्र, परकीय चलन मालमत्तांमध्ये (एफसीए) किरकोळ घट नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात परकीय चलनसाठ्यात 1.877 अब्ज डॉलर्सची घट झाली होती.