

कोपरखैरणे: तुर्भे स्टोअर येथे मंगळवारी अझारुन्निसा अब्दुल वाहिद या 66 वर्षीय महिलेचा मृतदेह पोत्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गळा आवळून किंवा तोंड दाबत श्वास कोंडून ठार मारले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अझारुन्निसा या तुर्भे स्टोअर परिसरात कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. मात्र घरी परतल्या नाहीत.मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास याच परिसरातील घर क्रमांक 265 समोर एका निळ्या पाण्याच्या पिंपाच्या आधाराने ठेवलेले एक पोते आढळून आले.
ते पोते काही जणांनी उघडून पाहिले असता त्यात अझारुन्निसा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील पथकासह घटनास्थळी पोहचले.
मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवण्यात आला. अब्दुल वाहिद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
सोन्यासाठी हत्येचा नातेवाइकांना संशय
महिलेच्या अंगावरील असलेले सोने आढळून न आल्याने सोन्यासाठी हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करीत नागरिकांनी मंगळवारी काहीकाळ ठाणे-बेलापूर मार्गांवर रास्ता रोको केला.