Mumbai Theft Crime: मुंबईत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन महिन्यांत ३,९४१ चोरी-घरफोड्या, दर ३३ मिनिटांनी एक गुन्हा

मोबाईल, वाहने आणि बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
Mumbai Theft Crime
Mumbai Theft CrimePudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई पोलिसांच्या एप्रिल, मे आणि जून २०२६ या तीन महिन्यांच्या मासिक गुन्हे अहवालातून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. या कालावधीत शहरात चोरी आणि घरफोडीचे एकूण ३,९४१ गुन्हे नोंदविण्यात आले.

म्हणजेच मुंबईत दररोज सरासरी ४३, तर प्रत्येक ३३ मिनिटांनी एक चोरी किंवा घरफोडी घडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mumbai Theft Crime
Water Transport: जलमार्ग वाहतुकीतून कमाई भारी, एका वर्षात २०० कोटींची भरारी

मुंबईत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी, दुचाकी-चारचाकी वाहनचोरी, घरफोडी, दुकाने फोडून चोरी आणि साखळी चोरीच्या घटना नोंदवल्या जात आहेत. रेल्वे स्थानके, बाजारपेठा, मॉल्स आणि दिवसभर कुलूपबंद असलेली घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे तपासातून समोर येत आहे.

मुंबई पोलिसांनी अनेक सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असला, तरी गुन्ह्यांची संख्या अजूनही मोठी आहे.या काळात चोरीच्या १,०६४, तर घरफोडीच्या २१० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.आकडेवारीवरून चोरीच्या गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण केवळ २९ टक्के असल्याचे दिसून येते. त्याउलट घरफोडीच्या ६४ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

गेल्या तीन महिन्यांत शहरात काही गाजलेल्या चोरीच्या प्रकरणांनीही लक्ष वेधले. मागाठाणे पोलिसांनी एमटीएनएलच्या भूमिगत केबल चोरीचा पर्दाफाश करत सुमारे १.१० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत केबल्स, जेसीबी आणि टेम्पो जप्त करण्यात आला.

Mumbai Theft Crime
Ravi Rana News: शिंदे, ठाकरेही एकत्र येणार; आमदार रवी राणा यांचा दावा

तसेच विविध पोलिस ठाण्यांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करून शेकडो मोबाईल हस्तगत केले.दक्षिण परिमंडळ-२ मधील पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांमधील ७३.१८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला.

यात ३१७ मोबाईल, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश होता. या कारवाया तपासातील यश दाखवत असल्या, तरी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज आहे.

दरम्यान,पावसाळ्यात अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असते. तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल आणि पाकीटमारीच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबईकरांनी काय काळजी घ्यावी?

  • घर बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती द्या

  • सीसीटीव्ही आणि अलार्म यंत्रणा कार्यरत ठेवा.

  • वाहनांना अतिरिक्त लॉक लावा.

  • गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळा.

  • संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास त्वरित ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.

तीन महिन्यांतील चित्र

  • एकूण चोरी व घरफोडीचे गुन्हे : ३,९४१

  • कालावधी : एप्रिल ते जून २०२६

  • दररोज सरासरी गुन्हे : सुमारे ४३

गुन्हेगारीचा बदलता ट्रेंड

गेल्या काही वर्षांत पारंपरिक घरफोडीबरोबरच मोबाईल चोरी, वाहनचोरी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे स्थानके, बाजारपेठा, मॉल्स, बसस्थानके आणि गर्दीची ठिकाणे चोरट्यांचे प्रमुख लक्ष्य बनत आहेत. दुसरीकडे, दिवसा बंद असलेली घरेही घरफोड्यांसाठी सहज लक्ष्य ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news