

कांदिवली: नुकताच पावसाचा शिडकावा झाला आणि दुसऱ्या दिवसापासून चारकोप हिंदुस्थान नाका येथील दुकानांमध्ये ताडपत्री खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली.निळी,काळी, पिवळी ताडपत्री तसेच दोन तीन रंगातील प्लास्टिक, पारदर्शक सफेद आणि बॅनरच्या प्लास्टिक दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होवूनही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे, असे सरगम पॅकेजिंग दुकानाच्या मालकाने सांगितले.
कांदिवली पश्चिमेला हिंदुस्थान नाक्यावर बांबू, पत्रे, सिमेंट पत्रे, लोखंडी अवजारे आणि यंत्रसामग्रीची अनेक दुकाने आहेत. या दुकानांत सर्वच साहित्य योग्य दरात मिळत असल्याने याठिकाणी नेहमीच ग्राहकांची गर्दी असते.बांबू, पत्रे, सिमेंट पत्रे, आणि पॅकेजिंग व्यावसायिक पावसाळ्यापूर्वी ताडपत्री विकतात.
एक चौरस फूट ताडपत्रीसाठी किमान 3 रुपये ते कमाल 9 रुपयांपर्यंतचे दर आहेत. यात साधी निळी ताडपत्री, निळी जाड, काळी टणक, टिकाऊ, डबल कोटिंग, मेण कापडासारखी वर्जिन जी सर्वात महागडी आहे,जी दोन तीन वर्षे सहज टिकते, अशा विविध ताडपत्र्या उपलब्ध आहेत. तसेच 150 व 200 गेजच्या ताडपत्रीमध्ये साईजप्रमाणे 100 ते 600 रुपयांचा फरक पडतो.
चारकोप विभागात के डी कंपाऊंड, भाबरेकर नगर, घास गल्ली, जय महाराष्ट्रनगर, रेणुकानगर आणि बंदर पाखाडी हा स्लम विभाग असल्याने तेथील रहिवासी ताडपत्रीपेक्षा प्लास्टिक पसंद करतात.सफेद, काळ्या आणि बॅनर प्लास्टिकला जास्त मागणी आहे.कारण हजार, दीड हजारात 20 बाय 30 फुटाचे प्लास्टिक मिळते.
त्यात संपूर्ण घर झाकून जाते, असे ग्राहक संतोष जाधव यांनी सांगितले. प्लास्टिक हे 120 ते 150 रुपये किलो रुपयांनी मिळते. चारकोप,महावीरनगरमध्ये म्हाडा वसाहत आहे. यामध्ये चाळीत एक व दुमजली घरांवर हमखास ताडपत्री टाकावी लागते.
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुजर यांनी सांगितले की, म्हाडामध्ये शक्यतो ताडपत्र्या जाड, टिकाऊ, वर्जिनवाल्या वापरतात. दोन -तीन वर्षे बघावे लागत नाही.फक्त पावसाळा संपल्यानंतर व्यवस्थित सुकवून घडी घालून ठेवावी लागते.हातगाडी, टेम्पो ट्रक, रस्त्यावरील व्यावसायिक, दुकानदारही प्लास्टिक व ताडपत्र्यांचा वापर करतात.यामुळे पावसाळ्यापूर्वी हिंदुस्थान नाक्यावर ताडपत्री विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.