मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत पदपथावर खाद्यपदार्थ विकण्यास हायकोर्टाची बंदी असतानाही वडापाव, पावभाजी, मसाला डोसा, पाणीपुरी, सँडविच व अन्य खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांसह स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून केवळ थातूरमातूर कारवाई होत असल्यामुळे खाद्यपदार्थ विकणार्यांना कोणाचा भयच उरला नसल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांत सुटलेल्या नाही. या फेरीवाल्यांमध्ये खाद्यपदार्थ विकणार्या गाड्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. विशेषत: रेल्वे स्टेशन, मार्केट, शाळा, महाविद्यालय व पर्यटन स्थळी खाद्यपदार्थांच्या गाड्या दिसून येतात. यात वडापावच्या गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याशिवाय मसाला डोसा पाणीपुरी, चायनीज, पावभाजी आदी गाड्या व स्टॉलची संख्या सर्वाधिक आहे. यात लिंबू पाणी व अन्य सरबताच्या दुकानांचाही समावेश आहे. उघडपणे हे खाद्यपदार्थ विकले जात असताना पालिकेचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर काही वेळा थातूरमातूर कारवाई करून, पालिका विभाग कार्यालय मोकळे होतात. मात्र या गाड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
संपूर्ण मुंबई शहरात अशा प्रकारच्या रेल्वे स्टेशन व सार्वजनिक ठिकाणी सात ते आठ हजारांपेक्षा जास्त खाद्यपदाथार्ंच्या गाड्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक गाड्यांवर तेथेच खाद्यपदार्थ बनवण्यात येतात. यावेळी सिलिंडरचा वापर करण्यात येतो. रस्त्यावर सिलिंडर वापरणे पूर्णपणे बंदी असताना राजरोसपणे वापर होत असतानाही पालिका त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप मुंबईकरांकडून होत आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने खाद्यपदार्थ गाड्यांसह त्यांचे सिलिंडर जप्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे रस्त्यावर खाद्य पदार्थ विकण्यावर नियंत्रण आले होते. पण आता कारवाई होत नसल्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता कोणाचा भयच उरलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत गाड्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
राजकीय पक्षांचा पाठिंबा
खाद्यपदार्थ गाड्यांना विशेषता वडापाव व चायनीज गाड्यांना विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असतो. महापालिका कारवाईला गेल्यानंतर या राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून हस्तक्षेप करण्यात येतो. यातील अनेक गाड्या या राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला कारवाई करताना अडथळा निर्माण होत असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे.
पालिका दररोज अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करते. अशावेळी खाद्यपदार्थांच्या गाड्या जप्त केल्या जातात. परंतु अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या या रात्रीच्या वेळी लागत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे.